निवडणुकीच्या आधीच रविकांत तुपकरांनी "मैदान" जिंकले...! आता खा. जाधवांचे काय?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरत आहेत. २ एप्रिलला ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. खा.प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर,संदीप शेळके, वसंतराव मगर यांच्याशी त्यांची लढत होणार आहे. मात्र निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाआधीच रविकांत तुपकर यांनी "मैदान" जिंकले आहे..
  होय..खा.प्रतापराव जाधव हे देखील २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे २ एप्रिल रोजी रविकांत तुपकर समर्थक आणि खासदार प्रतापराव जाधव समर्थक आमने सामने येण्याची चिन्हे आहेत. याआधी तीन निवडणुकांत खासदार प्रतापराव जाधवांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खा.जाधव यांनी तिन्ही वेळा ज्या मैदानात अर्ज भरतेवेळी पहिली सभा घेतली होती ते जिजामाता प्रेक्षागार शेजारील नाट्य क्रीडा मंडळाचे मैदान यावेळी खा.प्रतापराव जाधव यांना मिळणार नाही. कारण खा.जाधव यांच्याधीच ते मैदान मिळावे म्हणून रविकांत तुपकर यांचा अर्ज निवडणूक विभागाकडे पोहचला होता. त्यामुळे निवडणूक विभागाने त्या मैदानावर सभा घेण्याची परवानगी तुपकर यांना दिली आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच तुपकरांनी मैदान जिंकल्याची चर्चा आहे. खा.जाधव यांना आता सभेसाठी दुसरी जागा शोधावी लागणार आहे. त्या आता खा.जाधव काय करणार? कोणत्या मैदानाची मागणी करणार याकडे लक्ष लागून आहे.