संत नगरी शेगावात रविकांत तुपकर गरजले! म्हणाले, शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हा पठ्ठ्या शांत बसणार नाही;

अदानी अंबानीच कर्ज कसं माफ करता तस शेतकऱ्यांच करा म्हणाले; एल्गार रथयात्रेचे शेगावातून प्रस्थान...
 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदा महाराष्ट्रात ९० टक्क्यांपेक्षा अधिक भागात दुष्काळी स्थिती आहे. अपुऱ्या पावसाने सोयाबीनचे उत्पादन घटले मात्र यंदा उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. सोयाबीनचे सध्याचे भाव पाहता शेतकरी मोठ्या तोट्यात आहे. त्यामुळे स्वामीनाथच्या सूत्रानुसार उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के असा किमान १० हजार भाव मिळालाच पाहिजे. कापसाला १३ हजार रुपये भाव मिळाला पाहिजे. शेतकरी मायबापाच्या न्यायहक्कांसाठी ही एल्गार रथयात्रा आहे. गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपण ही यात्रा सुरू केली आहे, ते सरकारला सद्बुद्धी देतीलच. १९ नोव्हेंबर पर्यंत सरकारने आमच्या मागण्यांवर निर्णय घेतला नाही तर २० नोव्हेंबरला बुलडाण्यात लाखो शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा होईल. २० नोव्हेंबर नंतर अख्ख्या महाराष्ट्रात आंदोलन सुरू होईल. काहीही झाले तरी शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय हा पठ्ठा स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेगावात केली. श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रविकांत तुपकरांच्या नेतृत्वातील एल्गार रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली, यावेळी तुपकर बोलत होते.
सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील एल्गार रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली. जिल्हाभरातून हजारो शेतकरी यासाठी शेगावात दाखल झाले होते. प्रारंभी रविकांत तुपकर श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. एल्गार रथयात्रेची भूमिका त्यांनी विशद केली. राज्यात सगळीकडे दुष्काळाची स्थिती असताना केवळ ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला,हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. सरकारने राज्यासह बुलडाणा जिल्ह्यात सरसकट दुष्काळ जाहीर केला पाहिजे असे तुपकर म्हणाले. अदानी अंबानीच कर्ज जस माफ करता तस शेतकऱ्यांच का करीत नाही असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला . माझा कुणीही गॉडफादर नाही, शेतकरी मायबापच माझे गॉडफादर आहे. माझ्या मायबापाच्या हक्कासाठी सरकारच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही असे तुपकर यावेळी म्हणाले..