रविकांत तुपकरांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला केली जोरदार सुरुवात!घाटाखाली-घाटावर बूथ रचना व नियोजनांच्या बैठकींचा धडाका

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हाभरातील शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि तरुणांचा सातत्याने होत असलेला रेटा पाहता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. त्या अनुषंगाने नियोजनाच्या बैठकांचा धडाका देखील सुरू झाला आहे. बुलढाणा येथील गोलांडे लॉन्स येथे ६ जानेवारी रोजी घाटावरील महत्वाच्या शिलेदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली तसेच ७ जानेवारीला खामगाव येथे देखील जळगाव जामोद व खामगाव या दोन्ही मतदारसंघातील प्रमुख शिलेदारांची बैठक पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बुथ रचनेचा आढावा व पदाधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या या बैठकीत देण्यात आल्या. तसेच लोकसभा निवडणूकीच्या नियोजनासंदर्भात देखील सविस्तर चर्चा या बैठकीत झाली.
 

                       जाहिरात 👆

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याकडे लोकसभेचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात बुलढाणा लोकसभेसाठी रविकांत तुपकर या नावाची जोरदार चर्चा आहे. तर तुपकरांनी देखील यावेळी आपण शेतकरी व तरुणांच्या आग्रहास्तव पूर्ण ताकदीनिशी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केलेले आहे. त्याच अनुषंगाने आता संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांचा धडाका रविकांत तुपकर यांनी सुरू केला आहे. घाटावरील शिलेदारांच्या बुलढाणा येथे तर घाटाखालील पदाधिकाऱ्यांच्या खामगाव येथे नुकत्याच बैठका पार पडल्या. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढायचा निर्धार करून गावगाड्यातील शेतकऱ्यांनी ताकदीनीशी कामाला सुरुवात केली. बूथ बांधणी, संघटनात्मक रचना यावर सविस्तर चर्चा करून प्रत्येक पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. ही निवडणूक शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची असून शेतकरी विरोधी धोरण बदलण्यासाठी आपल्या हक्काचा प्रतिनिधी सभागृहात जाणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवर लढताना आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता निवडणूक लढवण्याची योग्य वेळ आली असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. `एक व्होट- एक नोट´ या तत्वाने आणि जिल्हाभरातील गावखेड्यांसह शहरी भागातील सगळ्यांच्या साथीने ही लढाई जिंकू, असा विश्वास देखील याबैठकीत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध जबाबदाऱ्या देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तरुणांनी यावेळी स्वयंस्फूर्तीने जबाबदाऱ्यां स्वीकारल्या आणि त्या पूर्णत्वास नेण्याचा निर्धारही व्यक्त केला. 
 
तुपकरांचा स्वबळाचा नारा...`एक व्होट -एक नोट चा फार्मुला..´
रविकांत तुपकर नेमके कोणत्या पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढविणार याबाबत अद्याप कोणतेच स्पष्ट संकेत समोर आलेले नाहीत. याबाबत मतदारसंघात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पण तुपकरांनी शेतकऱ्यांच्या बैठकांमध्ये स्वतंत्र तयारीला सुरुवात करून `एक व्होट- एक नोट´चा फार्मूला वापरून स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. कोणत्या पक्षासोबत युती हो अगर ना होवॊ यावेळी संपूर्ण ताकदीने लढायचेच असा निर्धार शेतकऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला. आपण सर्वसामान्य जनता शेतकरी आणि तरुणांच्या बाळावरच ही निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.