रविकांत तुपकरांचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांवर गंभीर आरोप! म्हणाले, आमची माणसं फोडण्यासाठी पैशांचा वापर; केंद्रीय राज्यमंत्री झाले तरी त्यांची सवय जात नाही..!
तुपकर आता गावागावात उभारणार "ठोकाठोकी" करणाऱ्या पोरांची टीम...
Feb 25, 2025, 18:11 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाण्यात पदाधिकारी व शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीतील भाषणही नेहमीप्रमाणे वादळी ठरले. सोयाबीन कापूस भावफरक, कर्जमुक्ती, नाफेडचे अनुदान, पीकविमा यासह शेती प्रश्नांवर पुढील आठवड्यात आक्रमक आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हाभरात यात्रा आणि त्यानंतर मुंबईवर धडक असे आंदोलनाचे स्वरूप असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याच बैठकीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या संघटन वाढीसाठी आवश्यक बाबींवर देखील चर्चा करण्यात आली. संघटनात्मक धोरण ठरवण्यासाठी पुण्यात ३ मार्चला राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे ही तुपकर म्हणाले. दरम्यान आपल्या भाषणातून रविकांत तुपकर यांनी विरोधकांसह केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. पैसे देऊन आमची माणसे फोडण्याचा प्रयत्न होत आहे, केंद्रीय राज्यमंत्री झाले तरी प्रतापरावांची सवय जात नाही.. प्रतापरावांना रोज माझं ध्यान येतं.. अशा शब्दात तुपकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर हल्लाबोल केला..
रविकांत तुपकर यांचा माणूस तोडण्यासाठी ते काम करत आहेत. पैसे देऊन माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी ते माणूस शोधत आहेत, मात्र अद्याप त्यांना माणूस मिळाला नाही. गेल्याच आठवड्यात आपल्या काही माणसांवर प्रयोग झाल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रूपाने आपण गावगाड्यातल्या विस्थापितांची मोट बांधत आहोत. प्रस्थापितांची हुकूमशाही मोडून काढण्यासाठी हा लढा असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले. महाविकास आघाडीचे काही लोक रविकांत तुपकर यांच्यामुळेच आपण पडलो असे बोंबलत आहेत, ते उगाच मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. मी लोकसभेत पराभूत झालो पण कुणावर खापर फोडले नाही. कुठलं दुखणं कुठे काढण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही जशास तसे उत्तर देऊ असेही तुपकर यांनी ठणकावून सांगितले.
गावागावात ठोकाठोकी करणाऱ्या पोरांची टीम...
दरम्यान रविकांत तुपकर यांनी आपल्या भाषणातून काही अधिकाऱ्यांवर देखील शाब्दिक वार केला. अधिकारी सत्ताधाऱ्यांचे चमचे म्हणून काम करत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या आदेशाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडू नका. दिसेल तिथेच ठोका असेही तुपकर म्हणाले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या प्रमाणे प्रति सरकार स्थापन करणार असून ३ मार्चला त्याची घोषणा करणार असल्याचे तुपकर म्हणाले. प्रत्येक गावात १० –२० पोरांची ठोकाठोकी करणाऱ्या पोरांची टीम उभी करणार. ही टीम शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांना ठोकाठोकी करणार आहे असे रविकांत तुपकर म्हणाले..
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा...
दरम्यान आपल्या भाषणातून रविकांत तुपकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले. ज्यांना ज्यांना जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगरपालिका निवडणुका लढाच्या आहेत अशा कार्यकर्त्यांनी उद्यापासूनच तयारीला लागा. लोकांमध्ये जा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा..त्यांच्या समस्या सोडवा असा सल्ला तुपकर यांनी दिला. ..