राहुल बोंद्रेंनी केलेले ५६ कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप खोटे? बुलडाणा आणि चिखलीचे तहसीलदार म्हणतात आतापर्यंत एक रुपयाही खर्च झाला नाही..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आज सायंकाळी बुलडाणा येथे पत्रकार परिषद घेत चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यांच्या कामात ५६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेत एक कथित कॉल रेकॉर्डिंग देखील ऐकवली होती..मात्र राहुल बोंद्रे यांनी केलेले आरोप खोटे आहेत की काय? असा सवाल उपस्थित झाला आहे..कारण बुलडाणा आणि चिखली तहसीलदारांच्या स्वाक्षरीने निघालेल्या एका पत्रात बुलडाणा आणि चिखली तालुक्यात मातोश्री पाणंद रस्त्याच्या कामात आतापर्यत एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे..
 सातगाव म्हसला येथील योगेश राजपूत यांनी बुलडाणा तालुक्यात मातोश्री पाणंद रस्त्यावर आजपर्यंत झालेल्या खर्चाची माहिती तहसीलदारांना मागितली होती. त्यावर तहसीलदार यांनी पत्र दिले असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाणंद रस्त्यांच्या कामात एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे म्हटले आहे. अशाच आशयाची माहिती चिखली तहसीलदारांना संतोष काळे यांनी मागितली होती त्यावर देखील तहसीलदारांनी उत्तर दिले असून चिखली तालुक्यातील मातोश्री पाणंद रस्त्यांच्या कामात आतापर्यंत एक रुपयाही खर्च झाला नसल्याचे म्हटले आहे.
 विशेष म्हणजे राहुल बोंद्रे यांनी बिले काढण्याचा आरोप केला होता. मात्र तहसीलदारांनी दिलेल्या पत्रामुळे राहुल बोंद्रे यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत..एकंदरीत या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे...