ओबीसी बांधवांना पुन्हा धक्का! जागा "ओपन' करून होणार निवडणूक!!
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार आहे. सुप्रिम कोर्टाच्या मागील निर्णयामुळे यातील ओबीसींच्या 8 जागा रिक्त ठेवून उर्वरित जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. याचबरोबर संग्रामपूर व मोताळा नगरपंचायतीची निवडणूक देखील 21 तारखेलाच होणार आहे. या ठिकाणी सुद्धा ओबीसी आरक्षित असलेल्या प्रत्येकी 4 मिळून एकूण 8 जागा वगळून या निवडणुका घेण्यात येत आहे. आता या जागांचे आरक्षण रद्द करून त्या जागा अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यातील महिला आरक्षण सुद्धा ठरवावे लागणार आहे. यासाठी सुद्धा 18 जानेवारीला मतदान घेण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही नगरपंचायतींमधील 34 जागांची मतमोजणी 19 जानेवारीला घेण्यात येईल.
प्रशासकीय कसरत
दरम्यान, या आदेशामुळे केवळ ओबीसी बांधवांवरच अन्याय झाला नसून, कर्मचाऱ्यांना नव्याने तयारी करावी लागणार आहे. मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यातील निवडणूक विभागाचे कर्मचारी निवडणुकांच्या कामकाजात व्यस्त आहेत. आता त्यांना एकाच संस्थेच्या निवडणूक दोनदा घ्याव्या लागणार आहे. ज्या ठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथे 20 डिसेंबरला सोडत काढण्यात येईल. या जागांसाठी 28 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान नामांकन प्रक्रिया पार पाडून 4 जानेवारीला छाननी करावी लागणार आहे. 6 जानेवारीला माघारीची मुदत संपल्यावर त्यांना चिन्ह वाटप करावे लागणार आहे. यानंतर 18 जानेवारीला होणाऱ्या मतदानाची अन् 19 च्या मतमोजणीची जय्यत तयारी करावी लागणार आहे.