बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ): उद्धव ठाकरे साहेब एकदा शब्द दिल्यानंतर फिरवत नाहीत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकाचाच येणारा काळ हा उज्वल आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मतदार सजग असून इथे जातीपातीच्या राजकारणाला थारा नाही. लवकरच आचारसंहिता लागेल असे चित्र आहे . त्यामुळे जालिंदर बुधवत यांच्या रूपाने आपल्याला विजयाची मशाल पेटवायची आहे आणि बुलढाण्यातून आपला हक्काचा आमदार राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठून उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे आहेत, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी केले.
बुलढाणा येथील जनशिक्षण संस्थेच्या सभागृहात प्राध्यापक खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे, संदीप शेळके , प्राध्यापक डी.एस. लहाने , माजी सभापती सुधाकर आघाव, अशोक मामा गव्हाणे, तालुका प्रमुख लखन गाडेकर, बुलढाणा शहर प्रमुख हेमंत खेडेकर, मोताळा शहर प्रमुख रमेश धूनके, आशिषबाबा खरात, युवा सेना तालुका प्रमुख संजय शिंदे, युवा सेना शहरप्रमुख सचिन परांडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राध्यापक खेडेकर म्हणाले की, बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकदा निवडून आलेला आमदार सलग दुसऱ्यांदा निवडून येत नाही. शिवसेनेसोबत गद्दारी करणारा आमदार इथे पुन्हा आमदार होत नाही, हा आजवरचा इतिहास आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्वासक आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे. जालिंदर बुधवत यांच्या रूपाने आपल्याला विजयाची मशाल पेटवायची आहे. काही लोक खोट्या बातम्या पेरतात आणि त्याची चर्चा घडवून आणतात. काळजी करण्याचे कारण नाही ,मातोश्रीवर केवळ निष्ठावंतांचीच काळजी घेतली जाते. असे सूचक विधान सुद्धा प्राध्यापक खेडेकर यांनी केले.
मशाल यात्रेने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली - जालिंदर बुधवत
बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण काढलेली मशालजागर यात्रा गावागावात पोहोचली. आक्रोश मोर्चाने दणाणलेला बुलढाणा शहर आगामी काळातली गणित स्पष्टपणे सांगून गेला आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवसेनेत उद्धव साहेबांच्या नेतृत्वात नव्याने अनेक सहकारी जोडत आहेत आपल्या बुलढाण्यातही संदीप शेळके, प्राध्यापक डी एस लहाने सर यांच्यासह अनेक नवे सहकारी आपल्या सोबत आले आहेत या प्रत्येकाचा सन्मान आगामी काळात ठेवल्या जाईल. सहकारी म्हणून भाऊ म्हणूनच त्यांना आम्ही आमच्या सबत कायम ठेवू असे याप्रसंगी जालिंदर बुधवत म्हणाले. याप्रसंगी संदीप दादा शेळके यांनी जालिंदर बुधवत यांना आपल्याला आमदार म्हणूनच आता मुंबईला पाठवायचे आहे त्यासाठी एकजुटीने काम करण्याच्या आवाहन केले.
तर प्राध्यापक डी.एस. लहाने म्हणाले की आपल्याला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. कोरोना काळात उद्धवसाहेबांनी केलेले काम जन माणसाच्या मनावर कोरले आहे. पक्षाने दिलेल्या संधीचे सोने करून संघटन वाढीसाठी झोकुन देऊन काम करू असेही यावेळी लहाने सर म्हणाले. महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे यांनी देखील सुरुवातीला मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.