"सध्याचे" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्ह्यात! चिखली तालुक्यातील इसरुळ येथे संत चोखोबारायांच्या मंदिरांचे करणार लोकार्पण; मात्र,आजचा निकाल विरोधात लागल्यास उद्याचा दौरा रद्द होण्याची शक्यता..
मुख्यमंत्री मुंबईवरून विमानाने छत्रपती संभाजीनगरला येतील. तिथून सकाळी ११वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरने इसरुळकडे प्रयाण करतील. १२ वाजून १० मिनिटांनी मुख्यमंत्री महोदयांचे इसरुळ येथील हेलिपॅडवर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने ते श्री.संत चोखोबारायांच्या मंदिराच्या परिसरात जाऊन मंदिरांचे लोकार्पण करतील. दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजी नगरकडे प्रयाण करतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहेत. याआधी समृध्दी महामार्गावरून ड्रायव्हींग टेस्ट करीत असतांना मेहकर टोलनाक्याजवळ ते उतरले होते,त्यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते.
आजचा निकाल विरोधात लागला तर..!
दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल देखील येण्याची शक्यता आहे. हा निकाल विरोधात लागला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्या अडचणी वाढतील. त्या १६ आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री शिंदे अग्रस्थानी आहेत. त्यांना अपात्र ठरविण्यात आल्यास त्यांना तातडीने पदाचा राजीनामा द्यावा लागु शकतो, असे झाल्यास ते उद्याच्या तारखेत मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्यामुळे त्यांचा उद्याचा दौरा रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वरिष्ठ राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.