"मानसपुत्रा"साठी प्रतापराव जाधव झाले "सारथी" ! डॉ.संजय रायमुलकरांचा उमेदवारी अर्ज भरताना बैलगाडीचे कासरे धरले हातात...
Updated: Oct 25, 2024, 18:33 IST
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नांद्रा धांडे या गावातला एक युवक आपल्या सोबतीने शिवसेनेत काम करत असताना त्या युवकाला आमदारकीपर्यंत नेण्याचे काम करणारे केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या "मानसपुत्र" असलेल्या डॉक्टर संजय रायमुलकर यांच्यासाठी सारथ्य केल्याचे चित्र काल जनमाणसासमोर आले.
महाभारतामध्ये समोर स्वकीय असले तरी प्रतिस्पर्ध्यांसमोर अर्जुनाला भक्कमपणे मार्गदर्शन आणि त्याच्यासोबत स्वतः रथाचे सारथ्य भगवान श्रीकृष्णाने केले होते. श्रीकृष्णासारखा मार्गदर्शक जर लाभला तर विजय हा प्रत्येक अर्जुनाचा होत असतो. काल परवा मेहकर विधानसभा मतदारसंघाची चौथ्यांदा उमेदवारी मिळालेले डॉ. संजय रायमुलकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत सादर झालेला हा अर्ज उद्याचे मनसुबे स्पष्ट करून गेला आहे. यावेळी एक महत्त्वाचे चित्र सगळ्यांनी अनुभवले. शेती-मातीशी नाळ असलेले केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार डॉ. संजय रायमुलकर हे एकाच बैलगाडीतून अर्ज भरण्यासाठी निघाले. बैलगाडीचे सारथ्य स्वतः प्रतापराव जाधव यांनी आपल्या मानसपुत्रासाठी केले. त्यामुळे श्रीकृष्णाच्या भूमिकेतील प्रतापरावांनी अर्जुनाच्या भूमिकेतील डॉ. रायमुलकरांचे सारथ्य करून एकप्रकारे विजयाचे संकेतच दिल्याचे उपस्थितांमध्ये बोलल्या जात होते....
आमदार डॉ.संजय रायमुलकर सलग चौथ्यांदा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत.त्याआधी सलग तीनदा या मतदारसंघावर प्रतापराव जाधवांनी भगवा फडकवला होता. या निवडणुकीत देखील स्वतः प्रतापराव जाधव यांनी लक्ष घातले आहे. डॉ.संजय रायमुलकर यांना चौथ्यांदा सभागृहात पाठवायचेच असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे...