'प्रतापपर्व.. सन्मान भूमिपुत्राचा  ना. प्रतापराव जाधव यांचा बुलडाण्यात नागरी सत्कार! परवा जंगी कार्यक्रमाचे आयोजन 

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा जिल्ह्यातील जनतेने चौथ्यांदा खासदारकीचा मान दिल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांची केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदी वर्णी लागली आणि जिल्ह्यात 'प्रतापपर्व' सुरू झाले. मंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ना. प्रतापराव जाधव यांचे पहिल्यांदाच जिल्हा मुख्यालयी बुलढाणा नगरीत आगमन होत आहे. या आनंदाच्या पर्वावर रविवार ३० जून रोजी त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे.
बुलढाणा शहरातील धाड नाका परिसरातील ओंकार लॉन येथे गौरव सोहळा आयोजित केला आहे. ना. प्रतापराव जाधव नागरी सत्कार समिती तथा समस्त बुलढाणेकरांनी भूमिपुत्राच्या गौरवाची जोरदार तयारी पूर्ण केली आहे.
या सोहळ्यात ना. प्रतापराव जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्रीताई जाधव तथा जाधव परिवाराचा सत्कार केला जाणार आहे. बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष राधेश्याम चांडक व बारोमासकार प्रा.डॉ. सदानंद देशमुख यांच्याहस्ते हा गौरव सोहळा पार पडणार आहे. अध्यक्षस्थानी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड उपस्थित राहतील. तसेच माजी राज्यमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. धीरज लिंगाडे यांची विशेष उपस्थिती आणि माजी आमदार विजयराज शिंदे, धृपदराव सावळे, हर्षवर्धन सपकाळ, डॉ. शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे गोकुळ शर्मा, मुख्त्यारसिंग राजपूत, योगेंद्र गोडे, विजय अंभोरे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
केंद्रीय मंत्रिपदी ना. प्रतापराव जाधव यांची निवड झाल्याची बाब जिल्ह्यावासीयांसाठी भूषणावह आहे, याच गौरवांकित क्षणासाठी नागरी सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भारतमाता पूजन, शिवपूजन, भव्य रॅली, ५१ तोफांची सलामी व बरेच काही..
३० जूनला सकाळी १० वाजता प्रतापगड स्वागत कमानीपासून खुल्या जीपमधून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानिमित्त रॅलीला प्रारंभ होणार आहे. प्रथम बुलढाणाकरांची ग्रामदैवत जगदंबेचरणी होणार नतमस्तक होऊन महापुजा ना. प्रतापराव जाधव करणार आहे. साडे१० वाजता कारंजा चौकातील भारत मातेचे पूजन केले जाईल, त्याचवेळी भूमिपुत्राला ५१ तोफांची सलामी देण्यात येईल. त्यानंतर आठवडी बाजार मार्गे भ्रमण करत जयस्तंभ चौकात पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे सकाळी ११ वाजता संगम चौकातील शिवस्मारकावर छत्रपती शिवारायांची महाआरती करण्यात येईल. सव्वाअकरा वाजता मुख्य नागरी सत्कार सोहळ्याला सुरुवात होणार आहे