चिखलीत वीज जोडण्या सुरू, अन्य जिल्ह्यात तोडणे सुरू...
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखलीच्या आमदार सौ. श्वेताताई महाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक होतात. एक महिला आमदार आणि विशेषतः विरोधी पक्षात असतानाही त्या प्रशासनाकडून कामे करून घेतात. मात्र दुसरीकडे अन्य लोकप्रतिनिधी या प्रश्नावर गप्प आहेत. शेतकऱ्यांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडायला महावितरणला भाग पाडणाऱ्या श्वेताताईंचा आदर्श आमचे लोकप्रतिनिधी कधी घेतील, असा झोंबणारा सवाल अन्य मतदारसंघातील नागरिक करताना दिसत आहेत. महावितरणने केवळ चिखली विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणे सुरू केले आहे. त्यामुळे अन्य लोकप्रतिनिधी का गप्प आहेत, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत का, असा सवालही शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
२९ नोव्हेंबर रोजी आमदार श्वेताताई महाले यांनी केलेले रास्ता रोको आंदोलन राज्यभर गाजले होते. महावितरणचे कार्यकारी अभियंता चिखलीत दाखल झाले आणि तीन दिवसांत विज कनेक्शन जोडून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. दुसऱ्याच दिवशीपासून आ. श्वेताताई मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्या. शेतकऱ्यांची जोडणी करून दिली. मात्र महावितरणकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्या काल, ३ डिसेंबर रोजी अचानक बुलडाणा येथील महावितरण कार्यालयात धडकल्या. ताईंचा रौद्रावतार पाहून अधिकाऱ्यांना कापरे भरले. तब्बल तीन तास त्यांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात ठिय्या मांडला. वीजजोडणी पूर्ववत होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही, अशी भूमिका ताईंनी घेतल्याने प्रशासन नरमले आणि २४ तासांच्या आत जोडणी करण्याचे लेखी आश्वासन दिले. ताईंनी ते आश्वासन कार्यकारी अभियंत्यांना मोठ्याने वाचून दाखवायला लावले. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. मात्र या तीन तासांत ताईंचा लढाऊबाणा पुन्हा एकदा समोर आला. २४ तासांत वीज कनेक्शन सुरू केले नाही तर विजेचे खांब उखडून फेकू, असा धमकीवजा इशारा द्यायलासुद्धा ताई विसरल्या नाहीत. ताईंच्या आंदोलनाचा व्हायचा तो परिणाम झाला. आज, ४ डिसेंबर रोजी वृत्त लिहितेवेळी चिखली विधानसभा मतदारसंघातील वीज कनेक्शन जोडण्याचे काम महावितरणने हाती घेतल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील लोक म्हणतात आमदार असावा तर असा....
सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या केल्या आहेत. खरीप अतिवृष्टीने हातातून गेल्यानंतर त्यांना रब्बीचाच एकमेव आधार आहे. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच महावितरणने शेतकऱ्यांकडून सक्तीने वीजबिल वसुलीचा सपाटा लावला. ज्या शेतकऱ्यांचे वीज बिल थकीत आहेत त्यांचे वीज कनेक्शन तोडणे जिल्हाभरात सुरू आहे. आमदार श्वेताताई महाले यांच्या आक्रमक बाण्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील तोडलेली वीज जोडणी सुरू आहे. यामुळे चिखलीत वीज जोडणी सुरू तर उर्वरित जिल्ह्यात वीज तोडणी सुरू असेच विचित्र चित्र आहे. त्यामुळे चिखली वगळता जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. श्वेताताईंच्या आंदोलनाच्या बातम्या जिल्हाभर पोहोचत असल्याने ताई आमच्या आमदार असायला पाहिजे होत्या, असे शेतकरी बोलू लागले आहेत. आमचे लोकप्रतिनिधी सत्तेत सहभागी असून आम्हाला न्याय मिळवून देऊ शकत नाही. केवळ मते मागण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचणारे लोकप्रतिनिधी आता हरवलेत कुठे, असा सवाल शेतकरी विचारू लागले आहे. खासदार जाधव अधिवेशनासाठी दिल्लीत असले तरी राज्यात त्यांची सत्ता असल्याने ते या विषयावर बोलायला तयार नाहीत. मेहकर, मलकापूर, बुलडाणा, सिंदखेड राजातील आमदारसुद्धा विजप्रश्नावर आक्रमकपणे समोर येताना दिसले नाहीत. सत्ता असल्याने आता शेतकऱ्यांची कशाला चिंता... निवडणुका जवळ आल्या की बघू, अशीच भूमिका तर त्यांनी घेतली नसावी ना, असा सवाल केला जात आहे.
फक्त चिखली विधानसभा मतदारसंघातीलच जोडणार..
काल आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी आंदोलन केल्यामुळे केवळ चिखली विधानसभा मतदारसंघातीलच शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडण्यात येणार आहे. तसा स्पष्ट उल्लेख कार्यकारी अभियंत्यांनी केला आहे. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना कुणी वाली नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.