कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून राजकारण पेटले! प्रशासकांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव;  निवडणूक लढवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ!

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा आरोप;म्हणाले, अन्यथा सोमवारी घेराव आंदोलन करणार! जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका घोषित झाल्याने राजकारण चांगलेच पेटले आहे. ३ मार्चला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र असे असले तरी बहुतांश अर्ज हे शेवटच्या दिवशी दाखल होण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण जिल्ह्यात चर्चेची ठरणाऱ्या चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक प्रकियेवरून चांगलाच वाद पेटण्याची चिन्हे आहेत. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. अनेकदा नोड्युल ( ना - देय) प्रमाणपत्राची मागणी करूनही प्रमाणपत्र देण्यास अधिकाऱ्यांकडून  टाळाटाळ करण्यात येत आहे. आमच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणापासून  दूर ठेवण्याचे मनसुबे सत्ताधारी पक्षाने रचला असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंनी केलाय. चिखली काँग्रेसचे काशिनाथआप्पा बोंद्रे यांनी तशी तक्रारही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली आहे. ही हुकूमशाही अशीच सुरू राहिली ,आम्हाला कागदपत्रे मिळाले नाहीत तर सोमवारी ३ मार्चला कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला घेराव घालणार असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.
 

देशात सध्या सगळीकडे हुकूमशाही सुरू आहे. दिल्लीतले लोन आता गल्लीत देखील पसरले असून लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न सत्ताधिकाऱ्यांकडून सुरू असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले.  चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत. विरोधी पक्षाकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना निवडणुकीसाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. कोणतीही थकबाकी नसतांना देखील  नोड्युल देण्यात आले नाही  व्यापारी, हमाल मापारी मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्याच्या लायसन्स  चे नूतनीकरण करून देण्यास सुद्धा अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. आम्ही सातत्याने तशी निवेदने दिली, त्यांना ईमेल देखील केले मात्र विरोधी पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रिजेक्ट करण्याचा डावच सत्ताधाऱ्यांचा दबावाखाली अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप राहुल बोंद्रेंनी केलाय. याचा आम्ही निषेध करतो, अधिकाऱ्यांचे हे आडमुठे धोरण सुरूच राहिले तर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाला घेराव घालणार असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक व सचिवांची प्रतिक्रिया घेतली असता असा कोणताही प्रकार नाही, सर्व काही प्रशासकीय नियमानुसार सुरू असल्याचे सांगण्यात आले.