POLITICAL SPECIAL "घड्याळीचा काटा रुते कुणाला"
डॉ.राजेंद्र शिंगणेंसाठी घड्याळ सुद्धा आव्हानच! कसे? ते बातमीत वाचा...
Nov 7, 2024, 08:36 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी .. मज फुलही रुतावे , हा दैवयोग आहे "...
हे शब्द मराठी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारे; अल्हाददायक वातावरण निर्मितीचे काव्य म्हणजे शांता शेळके यांच्या आशयगर्भशैलीतून तयार झालेल्या या ओळी. पण आता त्या इथे देण्याचे कारण काय? तर सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये निर्माण झालेला एक मोठा ट्विस्ट आहे. सिदखेडराजा मतदारसंघ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांचं समीकरण गेल्या पाच टर्म मध्ये इथे पाहायला मिळालं. पण त्यापैकी चार विधानसभा निवडणुका आणि दोन लोकसभा निवडणुका ते घड्याळ या चिन्हावर लढले होते. आता त्यांनी तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह हाती घेतले असले तरी घड्याळ सुद्धा मैदानात आहे. त्यामुळे तुतारी घराघरापर्यंत पोहोचवतांना "घड्याळाचे काटे रुतू नयेत" म्हणजे झालं. अर्थात कुठला "दैवयोग" कुणाच्या नशिबात आहे हे निवडणुकीत मात्र मतदार ठरवणार आहेत हे नक्की..
अगदी निवडणुका घोषित होईपर्यंत डॉ.शिंगणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होते. मात्र या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी त्यांनी घेतलेला वेळ महायुतीच्या इच्छुकांमध्ये गोंधळ निर्माण करून गेला..अर्थात तसे होण्यासाठी तो डॉ.शिंगणे यांच्या राजकीय खेळीचाच भाग होता हे काही लपून राहिलेले नाही. त्यानंतर महायुतीत डॉ.खेडेकर यांच्या उमेदवारीनंतर मनोज कायंदे यांच्याही गळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीची माळ पडली.मनोज कायंदे यांच्या उमेदवारीसाठी हट्ट धरणाते ॲड. नाझेर काझी यावेळी डॉ.शिंगणे यांच्यासोबत नाहीत यावरही लोक विश्वास ठेवायला तयार नाहीत.आता महायुतीत मैत्रीपूर्ण लढत विरुद्ध डॉ.शिंगणे असा हा सामना रंगणार असला तरी डॉ.शिंगणे यांना अपेक्षित असलेली सोपी लढत होईल अशी चिन्हे दिसत नाहीत..
तुतारी फुंकणारा माणूस पोहचवण्याचे आव्हान..
६ निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढल्याने डॉ.शिंगणे यांना तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. यावेळी घड्याळीवर असलेले मनोज कायंदे मूळचे काँगेसचे असल्याने अनेक काँग्रेसचे मतदार कायंदे यांच्यासोबत असतील.विशेष म्हणजे हे सर्व मतदार आधी डॉ.शिंगणे यांच्यासोबत होते,त्यामुळे त्याचा थोडाफार फटका डॉ.शिंगणे यांना बसणे अपरिहार्य आहे. डॉ.शिंगणे यांच्या पुतणी डॉ.गायत्री शिंगणे अपक्ष मैदानात आहेत..गायत्री शिंगणे यांना मिळणारी जी काही मते असतील ती कुणाच्या मतांमध्ये घट करणार आहे हे सांगायला काही ज्योतिषाची गरज नाही. महायुतीत सिंदखेडराजा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नसले तरी सामाजिक समीकरणांवर बराच खेळ अवलंबून असणार आहे.भाजपचे बहुतांश कार्यकर्ते डॉ.शशिकांत खेडेकर यांना साथ देण्याच्या मानसिकतेत आहेत, तसे झाले तर शशिकांत खेडेकर मोठे आव्हान डॉ.शिंगणे यांच्यासमोर निर्माण करतील.डॉ.शिंगणेंची २५ वर्षे विरुद्ध डॉ.शशिकांत खेडेकरांची ५ वर्षे असा नेरेटीव्ह या लढतीत शिंदेच्या शिवसेनेकडून सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे..त्याला डॉ.शिंगणे कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.. घड्याळीचे काटे नेमके कुणाला रुतणार यावरही लढतीचे चित्र अवलंबून राहील...