POLITICAL SPECIAL सिद्धार्थ खरातांचे नेतृत्व निष्ठावान शिवसैनिकांना अमान्य? बुलडाणा, सिंदखेडराजात जो माहौल झाला तो खरातांना जमला नाही;

निष्ठावानांची अनुपस्थिती खटकणारी! नाराजीनाट्य आ. रायमुलकरांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता...
 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा आणि सिंदखेडराजात सुपरहिट ठरलेल्या मशाल यात्रा आणि आक्रोश मोर्चाची कॉपी करण्याचा प्रयत्न काल, मेहकरात सिद्धार्थ खरातांनी केला. मात्र बुलडाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आणि सिंदखेडराजात दिलीप वाघ यांनी जसा माहौल तयार केला तो करण्यात सिद्धार्थ खरातांना अपयश आल्याचे दिसले. शिवाय उबाठा शिवसेनेच्या जुन्या - जाणत्या निष्ठावंत शिवसैनिकांनी कालच्या मोर्चापासून स्वतःला दूर ठेवले, त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सिद्धार्थ खरातांचे नेतृत्व शिवसैनिकांना मान्य नाही का? असा सवाल ऐरणीवर आला आहे..

बुलडाणा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांनी काढलेली मशाल यात्रा आणि त्यानंतरचा आक्रोश मोर्चा अभूतपूर्व आणि अति-विराट असा ठरला. खा.अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नरेंद्र खेडेकर , जालिंधर बुधवंत यांची वादळी भाषणे आणि त्यावर उपस्थित जनतेच्या उस्फुर्त टाळ्या - शिट्ट्या सर्व काही सांगून गेल्या. मातृतीर्थ सिंदखेड राजात दिलीप वाघ यांनी आयोजित केलेला मोर्चा देखील प्रस्थापितांना धडकी भरवणाराच होता. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या तसेच मंत्रालयात सचिव म्हणून काम करण्याचा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ खरातांनी देखील मेहकर येथे मोर्चाचे आयोजन केले होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मोर्चाला येतील अशी जाहिरात करण्यात आली मात्र दानवे काही या मोर्चाला उपस्थित राहिले नाहीत.👇

 

 

 

   मेहकरात शिवसेना म्हणून नेहमी दिसणारे अनेक चेहरे या मोर्चात दिसले नाहीत. उपजिल्हाप्रमुख प्रकाश डोंगरे या मोर्चात दिसले नाहीत. जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छीरे अखेरीस दिसले ते फक्त शरीराने..त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तहसीलदारांना स्वतंत्रपणे निवेदन दिले.
  गर्दी जमवण्यात अपयश...
खरेतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या निष्ठावान शिवसैनिकांची ताकद दिसली ती प्रारंभी मेहकरातच. गतवर्षी झालेली आदित्य ठाकरेंची सभा, गावोगावी झालेले मेळावे प्रचंड गर्दीचे झालेले दिसले..त्यामुळे मेहकरातील मोर्चा देखील विराट होईल असे वाटत होते, मात्र तसे काही झाले नाही..जी थोडीफार माणसे मोर्चात दिसत होती त्यांच्या चेहऱ्यावर ना उत्साह होता ना जोश..ज्या मैदानात सभा झाली,त्या मैदानाने आतापर्यंत अनेक सभा बघीतल्या..त्या तुलनेत कालची सभा अगदीच छोटी होती..त्यामुळे गर्दी जमवण्यात सिद्धार्थ खरात यांना अपयश आले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..👇
शिवसैनिक काय म्हणतात...
मेहकर विधानसभेत अनेक निष्ठावान शिवसैनिक आहेत. गत २० वर्षापासून अनेकांनी शिवसेनेसाठी जीवाचे रान केले मात्र केवळ तिकीट मिळवण्याच्या उद्देशाने शिवसेनेत आलेल्या खरात यांचे नेतृत्व आम्ही का मान्य करू? असा सवाल अनेक शिवसैनिकांनी "बुलडाणा लाइव्ह"शी बोलतांना केला. 
 तर आमदार रायमुलकरांना पुन्हा होईल फायदा...
 मेहकर विधानसभा मतदारसंघाचे स्वतंत्र असे एक समीकरण आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तब्बल ३ वेळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर खा.प्रतापराव जाधव यांनी हा मतदारसंघ राखीव झाल्यावर आ. रायमुलकरांच्या गळ्यात माळ घातली. आ. रायमुलकरांनी खा.जाधव यांचा विश्वास सार्थ ठरवत ३ वेळा मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला, आता चौथ्यांदा हा गड सर करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. आ. रायमुलकर यांचा पराभव करायचा असेल तर उबाठा शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची गरज आहे, शिवाय महाविकास आघाडी म्हणूनही एकजूट दाखवावी लागेल.👇
"निष्ठा" हा मुद्दा घेऊन उबाठा शिवसेनेला रिंगणात उतरायचे असेल तर त्यासाठी निष्ठावान शिवसैनिकांची मोट बांधावी लागेल. रणसंग्राम सुरू व्हायच्या आधीच जर अशा पद्धतीचे नाराजी नाट्य दिसले तर त्याचा फायदा मात्र निश्चितच आमदार संजय रायमुलकर यांना होऊ शकतो..