POLITICAL रविकांत तुपकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली! राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण; बुलडाणा विधानसभा मतदारसंघ तुपकरांसाठी सोडणार का ?

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल,८ ऑक्टोबर रोजी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. रात्री साडेआठच्या सुमारास ही भेट झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, सह -संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांची देखील उपस्थिती होती. यातील काही वेळ उद्धव ठाकरे व रविकांत तुपकर यांच्यात बंददाराआड चर्चा झाली. दरम्यान या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात नवनवीन चर्चांना उधाण आले आहे. रविकांत तुपकर मशाल हाती घेऊन शिवसेनेत प्रवेश करतात की स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणावर देखील तुपकर यांच्या शिवसेनेत येण्याने दूरगामी परिणाम होऊ शकतात. 

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून अडीच लाख मते घेतली होती. लोकसभा निवडणुकीआधी देखील तुपकर यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवावी अशी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची इच्छा होती. मात्र त्यावेळी नरेंद्र खेडेकरांना शब्द दिलेला असल्याने तुपकरांचे सुर जुळले नव्हते. मात्र निवडणूक निकलाअंती एकट्याच्या बळावर अडीच लाख मते घेत तुपकर महाविकास आघाडीच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष निघाला होता.

त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहीही करून रविकांत तुपकर आपल्या बाजूने असावेत यासाठी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच काल उद्धव ठाकरे आणि रविकांत तुपकर यांच्यात भेट झाल्याचे बोलले जाते..

तुपकरांच्या रुपाने राज्यस्तरीय चेहरा मिळणार?
  शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची राज्यभर लोकप्रियता आहे. याआधीच पुण्यात एक बैठक घेत राज्यातील २५ जागांवर उमेदवार उभी करण्याची घोषणा रविकांत तुपकर यांनी केली आहे.शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे तुपकर यांनी म्हटले होते. तसे झालेच तर याचा फटका जास्तीत जास्त महाविकास आघाडीलाच बसू शकतो.
त्यामुळे लोकसभेत घडले तसे अघटीत विधानसभेत होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील आहेत.त्यामुळे तुपकर यांना महाविकास आघाडीत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तुपकर यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवत महाविकास आघाडीत किंवा थेट शिवसेनेत प्रवेश केलाच तर शिवसेनेला राज्यपातळीवर शेतकरी नेता मिळणार आहे. 
कालच्या भेटीत उद्धव ठाकरे आणि रविकांत तुपकर यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. तुपकर यांचा शिवसेनेत प्रवेश झाला तर बुलडाणा किंवा सिंदखेडराजा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाऊ शकतो. एकंदरीत रविकांत तुपकर यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत,तुपकर यांनी इच्छुक उमेदवारांची धाकधूक देखील वाढवली आहे, शिवाय सत्ताधारी आमदारांच्या गोटातही जर - तरच्या चर्चा सुरू झाल्या आहेत....