political Breaking  मनात 'साहेब' ;  ओठावर सामूहिक निर्णयाची भाषा!! निर्णयाचा मुहूर्त दोन दिवसानंतरचा; जिल्हाप्रमुख तेल लावलेल्या मल्लासारखे  निसटतच राहिले!!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हे हेडिंग म्हणजे  वर्णन आहे , शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेचे! शिवसेनेतील बंडाळी गल्ली ते दिल्ली पर्यंत  पोहोचली असतानाच्या अन' मातोश्री' समोरचे आव्हान आणखीनच कडवे झाले असतांना बुधवत यांची आजची पत्रकार परिषद ब्रेकिंग न्यूज देणारी राहील, टीकेची तोफ डागणारी राहील हा प्रसिद्धी माध्यमाचा अंदाज मात्र काहीसा चुकला, किंबहुना त्यांचा अपेक्षाभंग झाला असे म्हणता येईल...
 

मुळातच आज 19 / 7 च्या दुपारी 12 च्या मुहूर्तावर आयोजित पत्रकार परिषदेचा विषय बुलडाणा बाजार समितीने सातेक वर्षात केलेली चौफेर प्रगती, ड वर्ग ते अ वर्ग अशी वाटचाल हा होता. त्यामुळे बुधवत यांनी आयोजन सभापती या नात्याने केल्याचे स्पष्ट झाले. मात्र माध्यमांनी सभापतींचे म्हणणे ऐकून प्रश्नरुपी बाणाचे नेम मात्र जिल्हा प्रमुख बुधवत यांच्यावरच धरले. मात्र त्यांनी कसलेल्या योध्यासारखे हे बाण टोलावून लावले आणि निर्णयाचा मुहूर्त जाहीर करून हा संवाद थांबविला. एरवी पत्रकार परिषदेचे शीर्षक विधानात्मक स्वरूपाचे राहते. पण बुधवत हे एखाद्या तेल लावलेल्या कसलेल्या पैलवानासारखे 'प्रेस' च्या हाती आलेच नाही ते द एन्ड पर्यंत निसटतच राहिले! यामुळे  बातमीचे हेडिंग असे का याचे हे उत्तर आहे.


 ' मातोश्री ' कडे कल अन निरोपाची भाषा...!

 मात्र जिल्हाप्रमुख काहीच  राजकीय बोलले नाही, असेही नाही. पण ते अप्रत्यक्ष बोलले, सावधगिरी बाळगून बोलले एवढेच. त्याचा मतितार्थ हाच की ते मूळ शिवसेनेतच राहणार, उद्धव ठाकरे हेच त्यांचे नेते राहणार अन  सेनेवरील त्यांची निष्ठा अढळ आहे. दोन आमदार गेले अन आता आधारवड असलेले खासदार देखील 'उठावात' सामील होण्याच्या बेतात असले तरी जालिंदर बुधवत हे शिवसेनेतच राहणार हे स्पष्ट  आणि  अंडर लाईन झाले! येत्या दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे बुधवत यांनी सांगितले. त्यापूर्वी इतर 2 जिल्हा प्रमुख, 2 महिला आघाडी प्रमुख, 5 उप जिल्हा प्रमुख, 3 सह संपर्क प्रमुख, 13 तालुका प्रमुख यांच्या समवेत आपण चर्चा करून निर्णय घेणार असे बुधवत यांनी सांगितले. हा निर्णय पत्रकार परिषद घेऊनच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.

बाजार समितीला आपल्या कार्यकाळात  सोन्याचे दिवस आले.  नजीकच्या काळात आपण प्रशासक असो नसो, भविष्यात आपण सभावती असू नसू पण ही प्रगती कायम असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली.  यामुळे एकप्रकारे त्यांनी बाजार समितीच्या निरोप घेल्यासारखी भाषा वापरली. मात्र तरीही एक शेतकरी, हितचिंतक म्हणून आपण समितीच्या विकास कामांवर करडी नजर ठेवणार हे सांगायला ते विसरले नाही. या आगळ्यावेगळ्या पत्रकार परिषदेचे साक्षीदार ठरले ते त्यांचे खंदे सहकारी राजू भैय्या मुळे, तालुका प्रमुख लखन  गाडेकर, गौतम बेगाणी,सुनील गवते, गजानन उबरहंडे, भगवान शेळके, संजय धंदर, शेषराव सावळे, मुन्ना सावळे यांच्यासह शेकडी समर्थक ठरले. प्रास्ताविक प्रवक्ते गजानन धांडे यांनी केले.