प्रस्थापितांबद्दल लोकांच्या मनात ठासून राग! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन; मुंबईच्या उमेदवाराबद्दलही केले वक्तव्य; म्हणाल्या, निवडणूक झाली की ते तोंड दाखवणार नाहीत.. 

 
 मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० वर्षे मेहकर - लोणार मतदारसंघात काहीच विकास झालेला नाही. लोकांच्या साध्या साध्या मागण्या देखील त्यांना पूर्ण करता आलेल्या नाहीत. इथे रोजगार नाही, सिंचन नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाहीत..त्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांच्या बद्दल लोकांच्या मनात ठासून भरलेली राग भरलेला आहे असे प्रतिपादन मेहकर - लोणार मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केले. एका वृतवाहीनीशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दलही विधान केले. ते मुंबईचे उमेदवार निवडणुकीच्या तोंडावर मतदारसंघात आले आहेत..निवडणुकीत पराभव झाल्यावर ते पुन्हा लोकांना तोंड दाखवणार नाहीत असे त्या म्हणाल्या.
 मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत. ३० वर्षांत काहीच झाले नाही, त्यामुळे पुढच्या ५ वर्षांत अनेक कामे आम्हाला करायची आहेत.प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. लोणारच्या पर्यटन वाढीसाठी पाऊले उचलायची आहेत असे डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या. निवडणूक प्रचारादरम्यान अतिशय उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोक प्रस्थापितांना कंटाळले आहेत त्यामुळे ही निवडणूक आम्हीच जिंकणार असा दावा डॉ.ऋतुजा चव्हाण यांनी केला आहे.