लोकांनी भरभरून दिलं; विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही! 

आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा अंचरवाडी वासियांना शब्द; डॉ. शिंगणेंवर जेसीबीतून फुलांची उधळण; गजानन वायाळ म्हणाले, दोन महिन्यांत पुन्हा विजयी मिरवणूक! १७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न...

 
चिखली(ऋषी भोपळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ढोल ताशांचा निनाद.. फटाक्यांची आतिषबाजी... जेसीबीतून झेंडूच्या फुलांची मुक्त उधळण... अन् डॉ.शिंगणे साहेब तुम आगे बढो च्या घोषणा...सोबतीला अधूनमधून पावसाच्या सरी.. डॉ. शिंगणे यांचा शब्द अन् शब्द कान देऊन ऐकणारे नागरिक...एखाद्या विजयी मिरवणुकीला साजेसा वाटावा असा थाट होता अंचरवाडी येथील सोहळ्याचा..सोहळा होता माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांतून १७ कोटी रुपयांच्या कामाच्या भूमिपूजन आणि लोकार्पणाचा...या सोहळ्याला आणखी बहारदार बनवले ते प्रख्यात कवी ,साहित्यिक अजीम नवाज राही यांच्या रसाळ सुत्रसंचालनाने...लोकांनी दिलेले प्रेम मी विसरणार नाही, आयुष्याचा क्षण क्षण माझा लोकांसाठी आहे..त्यामुळे लोकांच्या कामासाठी विकासनिधी कमी पडू देणार नाही असा शब्द यावेळी आ.डॉ.शिंगणे यांनी दिला अन् टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

अंचरवाडी येथील सरपंच सौ. कोकिळाताई समाधान परिहार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ,तालुकाध्यक्ष बाळू , उपसरपंच सौ.ज्योती सुनील खेडेकर, तहसीलदार श्री.काकडे, एकनाथराव थुट्टे, भानुदास घुबे, सुनील वायाळ, समाधान परिहार, ज्ञानेश्वर परिहार,गजानन परिहार यांच्यासह पंचक्रोशीतील सरपंच यावेळी मंचावर उपस्थित होते.

 

 

 

   पुढे बोलतांना आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले की,२००९ नंतर अंचरवाडीसह या भागातील २२ गावांचा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात समावेश झाला. त्यावेळी या २२ गावांचा पूर्ण विकास आराखडा आम्ही तयार केला, विकासकामांसाठी आधी या गावांना प्राधान्य दिले. २०१४ ते १९ या काळात मी आमदार नव्हतो,तेव्हा किती कामे झाले माहीत नाही. २०१९ ला लोकांनी पुन्हा भरभरून प्रेम दिल,आमदार झालो..मंत्री झालो.. पालकमंत्री झालो..कामांना सुरुवात करायचीच तर कोरोना आला, त्यावेळी सगळ काही बंद पडल, त्यामुळे राज्याचं महसुली उत्पन्न कमी झालं..जो काही पैसा उभा राहत होता तो लोकांना जगविण्यासाठी आरोग्यावर खर्च करावा लागला, कारण माणसं जगवंण हे त्यावेळी सर्वात महत्वाचं होत.. कोरोना गेल्यानंतर त्यातून सावरत असताना राज्यात राजकीय उलथापालथं झाली, उद्घव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वातील सरकार गेलं.. पुन्हा वर्ष सव्वा वर्ष विरोधी पक्षात काम करावं लागलं..लोकांची काम होत नव्हती, निधी मिळत नव्हता..त्यामुळे अजितदादांसोबत महायुतीत यायचा निर्णय घेतला असे आ. डॉ शिंगणे म्हणाले.
आता मिळालेल्या निधीतून भरपूर विकास कामे करण्याचा प्रयत्न केला, कोरोनाचा अडथळा आला नसता तर याहीपेक्षा जास्त कामे झाली असती असेही ते यावेळी म्हणाले..लोकांनी मला भरभरून दिलं आहे,त्यामुळे येणाऱ्या काळात देखील शेकडो कोटींची विकासकामे आपल्याला करायची आहेत. विकास कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा शब्द यावेळी आ.डॉ.शिंगणे यांनी दिला..
 गजानन वायाळ यांचे कौतुक...
 
यावेळी आपल्या भाषणातून आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन वायाळ यांचे तोंड भरून कौतुक केले..निधी कसा आणायचा, कुठून आणायचा..कशी सेटिंग करायची हे माझ्यापेक्षा त्यांना जमंत..माझ्याकडे विकास कामासाठी सातत्याने ते पाठपुरावा करतात असे डॉ.शिंगणे यावेळी म्हणाले.त्याआधी गजानन वायाळ यांनी आपल्या भाषणातून डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आव्हान केले. दोन महिन्यानंतर पुन्हा याच गावात विजय मिरवणूक काढू असे वायाळ म्हणाले...