लोकशाही संरक्षणार्थ जनसंवाद दहीहंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचे आवाहन; 

उद्या चिखलीत युवक काँग्रेसच्या वतीने दहीहंडी उत्सव;राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार येणार; अभिनेत्री प्रार्थना बेहेरे राहणार प्रमुख आकर्षण
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या २० वर्षांची परंपरा असणारा युवक काँग्रेसचा दहीहंडी सोहळा उद्या,६ सप्टेंबरला चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न होणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून झी मराठी वरील "माझी तुझी रेशीम गाठ" फेम मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. लोकशाही संरक्षणार्थ यंदाची जनसंवाद दहीहंडी असून या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार तथा जिल्ह्यात श्री छत्रपती शिवराय क्रीडा प्रतिष्ठान च्या माध्यमातून पहिल्यांदा दहीहंडी उत्सव सुरू करणाऱ्या राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
 या कार्यक्रमाची पूर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. चिखलीतील हा दहीहंडी सोहळा युवकांसाठी स्फूर्तीदायक ठरणार आहे. परिसरातील गोविंदांनी साहसी खेळ असलेल्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राहुल बोंद्रे यांनी केले आहे. २० वर्षांची सर्वात जुनी परंपरा असलेल्या या दहीहंडी उत्सवात ५ लक्ष रुपयांच्या बक्षिसांची लूट गोविंदा पथकांना करता येणार आहे,चिखली शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा जोपासणारा हा दहीहंडी उत्सव आहे असेही राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे.