अंचरवाडीत आज सायंकाळी परिवर्तन तथा एल्गार मेळावा! रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार 

 

अंचरवाडी(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यासाठी आज,२१ फेब्रुवारीचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला. शहर पोलिसांनी तुपकर यांना आधीच्या गुन्ह्यात मिळालेला जामीन रद्द करण्याची मागणी जिल्हा व सत्र न्यायालयाकडे केली होती, त्यावर आज मा. न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून लावत तुपकर यांचा जामीन कायम ठेवला. त्यामुळे तुपकरांना जेल की बेल? या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. "सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही." अशी बोलकी प्रतिक्रिया तुपकर यांनी न्यायालयाबाहेर आल्यावर माध्यमांशी बोलतांना दिली. दरम्यान या संपूर्ण घडामोडीनंतर आज सायंकाळी तुपकर चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे एल्गार तथा परिवर्तन मेळाव्याला संबोधित करणार आहेत. आजच्या मेळाव्यात या संपूर्ण घडामोडींवर ते अधिकचे भाष्य करण्याची शक्यता आहे, त्यामुळे अंचरवाडीच्या सभेत तुपकर नेमके काय बोलतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत..

 यंदा काहीही झाले तरी लोकसभा निवडणूक लढणारच अशी घोषणा तुपकर यांनी केली आहे. त्यानुषंगाने जिल्हाभरात तुपकर यांच्या एल्गार मेळाव्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई असल्याचे तुपकर सांगत आहेत. आज सायंकाळी अंचरवाडी येथे होणाऱ्या एल्गार व परिवर्तन मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे..