काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल! जिल्हाध्यक्ष बदलणार की पुन्हा राहुल बोंद्रेना संधी? काँग्रेस पक्ष निरीक्षकांचा आजपासून ३ दिवस जिल्हा दौरा; विधानसभा निहाय घेणार आढावा...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकेकाळी जिल्ह्यातला सर्वात शक्तिशाली पक्ष असलेल्या काँग्रेसची जिल्ह्यातील अवस्था आता न सांगितलेली बरी इतपत येऊन ठेपली आहे. चिखली, खामगाव, बुलडाणा या मतदारसंघासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचे प्राबल्य होते, गावागावातील गावपुढारी पक्क्या काँग्रेस विचारसरणीचे होते..६ –७ वर्षांपासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले राहुल बोंद्रे काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देतील असे काँग्रेस जणांना वाटत होते..मात्र गतवैभव तर प्राप्त झालेच नाही शिवाय जे होते तेही लयाला गेले... स्वतः राहुल बोंद्रे सलग दोन निवडणुका हारलेत, कशी बशी इज्जत म्हणून चिखलीची कृषी उत्पन्न बाजार समिती त्यांच्या ताब्यात आहे, पण त्यातूनही एक एक शिलेदार कधी दुसऱ्या गटात जाईल याचा नेम नाही..या सगळ्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत.. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यातच आता जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटी मध्ये संघटनात्मक बदल होणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आजपासून पक्ष निरीक्षक राजेंद्र राख यांचा दौरा आहे..
  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने बुलढाणा जिल्ह्यासाठी पक्ष निरीक्षक म्हणून राजेंद्र राख यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. आज ५ एप्रिलपासून ते बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे हे सुद्धा या दौऱ्यात राहतील. तालुका व जिल्हा कार्यकारणी नव्याने गठीत करण्याच्या उद्देशाने या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. आज दुपारी साडेबाराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात चिखली शहर व तालुका काँग्रेसची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी साडेचारला बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची बैठक जिल्हा मुख्यालयात होणार आहे. ७ एप्रिलला मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभेच्या बैठकी होणार आहे तर ८ एप्रिलला मेहकर आणि सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचा आढावा काँग्रेसचे पक्ष निरीक्षक घेणार आहेत.