शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आ.डॉ. शिंगणे आक्रमक!
सिंदखेडराजा मतदार संघातील वंचित शेतकऱ्यांना पिक विमा,
नुकसानीचा तात्काळ लाभ देण्याची मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी..
Jul 20, 2024, 15:17 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पिक विमा व नुकसान भरपाईचा लाभ अद्यापर्यंत देण्यात आला नाही. त्यामुळे नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अशी मागणी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १९ जुलै रोजी केली आहे.
खरीप हंगाम सन २०२३-२४ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील एकुण ३,५७,१७१ शेतकऱ्यांनी ५,९७,२२०.७७ हे. क्षेत्राचा पीक विमा भरला. त्यापैकी २,३७,७४५ शेतकऱ्यांना रक्कम रु. १३९.४५ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर झाली. अद्यापपर्यंत ६७,८७४ शेतकऱ्यांना रक्कम रु.३८.४९ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली असून १,६९,९०७ शेतकऱ्यांना रक्कम रु. १०१.४६ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करणे प्रलंबित आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील चिखली, लोणार, देऊळगांव राजा व सिंदखेड राजा या चार तालुक्यातील एकुण ५३,४७४ शेतकऱ्यांना रक्कम रु.२६.९९ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर आहे. परंतू अद्यापपर्यंत केवळ ८ शेतकऱ्यांना रक्कम रु.३८,१९९ इतकी नुकसान भरपाई पीक विमा कंपनीमार्फत वितरीत करण्यात आली असून अद्यापही ५३,४६६ शेतकऱ्यांना रक्कम रु.२६.९८ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करणे प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे रब्बी हंगाम सन २०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यातील एकुण १,९२,१३७ शेतकऱ्यांनी अर्ज सहभाग नोंदविला असून ६४,३६७ शेतकऱ्यांना रक्कम रु. १३२.७४ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर आहे. अद्यापपर्यंत केवळ ९,२८२ शेतकऱ्यांना रक्कम रु.१२.९३ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली असून ५५,०८५ शेतकऱ्यांना रक्कम रु.११९.८१ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करणे प्रलंबित आहे.
चिखली, लोणार, देऊळगांव राजा व सिंदखेड राजा या चार तालुक्यातील एकुण २२,८२४ शेतकऱ्यांना रक्कम रु. ४६.८७ कोटी इतकी नुकसान भरपाई मंजुर आहे. परंतु अद्यापपर्यंत केवळ ५,४५६ शेतकऱ्यांना रक्कम रु.७.३२ कोटी इत्तकी नुकसान भरपाई पीक विमा कंपनीमार्फत वितरीत करण्यात आली असून १७,३६८ शेतकऱ्यांना रक्कम रु.३९.५५ कोटी इतकी नुकसान भरपाई वितरीत करणे प्रलंबित आहे. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम सन २०२३-२४ मधील वंचित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता तात्काळ कार्यवाही होणे बाबत निर्देशित करण्यात यावे, अशी मागणी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली आहे.