पहिल्या दिवशी फलक कोराच!

70 हजार मतदार निवडणार 166 सदस्य
 
 
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील 124 ग्रामपंचायतींमध्ये खास ग्रामीण लढतीचा थरार रंगण्याच्या बेतात आहे. सदस्यांच्या तब्बल 166 पदांसाठी 21 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, आज, ३० नोव्‍हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे. मात्र पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाहीये!

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 4554 ग्रामपंचायतींच्या 7130 रिक्त पदांसाठीच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींच्या 166 पदांचा समावेश आहे. घोषित कार्यक्रमानुसार 22 नोव्हेंबरला 13 तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली. यानंतर आज 30 नोव्हेंबरपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली. 6 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान इच्छुकांना  उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून, अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार असल्याने 3 डिसेंबरपासून अर्ज सादर करण्यास गती येईल, असा अंदाज आहे.

 मेहकर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतींच्या 31, चिखलीतील 11 ग्रामपंचायतींच्या 15, मोताळ्यातील 14 ग्रामपंचायतींच्या 15, नांदुऱ्यातील 13 ग्रामपंचायतींच्या 18, मलकापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींच्या 13, खामगावमधील 15 ग्रामपंचायतींच्या 22, जळगाव जामोदमधील 8 ग्रामपंचायतींच्या 14, शेगाव व लोणारमधील प्रत्येकी 8 ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी 8, सिंदखेड राजामधील 4 ग्रामपंचायतींच्या 4, देऊळगाव राजामधील 5 ग्रामपंचायतींच्या 6 तर बुलडाणा तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींच्या 2 रिक्त जागांसाठी लढती रंगणार आहे.

महिलांचे लक्षणीय मतदान...
दरम्यान, या निवडणुकीसाठी 69 हजार 770 मतदार राहणार आहेत. यात 37 हजार 57 पुरुष तर 32 हजार 713 महिला मतदारांचा समावेश आहे. मेहकर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 10 हजार 133 मतदार आहेत. याखालोखाल खामगाव 8633, चिखली 7245, मोताळा 6649, नांदुरा 6336, संग्रामपूर 6335, मलकापूर 4674, देऊळगाव राजा 4001, जळगाव 3713, लोणार 3675, शेगाव 3471, बुलडाणा 2771, सिंदखेड राजा 2134 अशी तालुकानिहाय मतदार संख्या आहे.