ना. गुलाबराव पाटील,आ.संजय गायकवाडांच्या भाषणांनी धामणगाव बढेची सभा गाजली! गुलाबराव पाटील म्हणाले, प्रतापरावांचा विजय ही काळ्या दगडावरची रेष; विरोधकांचाही घेतला समाचार
Apr 19, 2024, 18:55 IST
धामणगाव बढे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ही देशाची निवडणूक आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचं सरकार येणार आहे. त्यामुळे इथे प्रतापराव नाहीत तर नरेंद्र दामोदरदास मोदी ५४४ जागांवर लढत आहे.त्यामुळे आपल्याला त्यांनाच मतदान करायचं आहे. जगात नरेंद्र मोदींमुळे देशाची मान उंचावली आहे, देशाचा गौरव वाढला आहे. देश सुरक्षित हातांमध्ये ठेवायचा असल्याने बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जनता पुन्हा एकदा प्रतापराव जाधव यांनाच चौथ्यांदा विजयी करणार आहे,ही काळ्या दगडावरची रेष आहे असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ गुलाबराव पाटील यांची जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. मंचावर खा.प्रतापराव जाधव, आ.संजय गायकवाड यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गुलाबराव पाटील आणि आ.संजय गायकवाड यांच्या आक्रमक व खा.जाधव यांच्या संयमी व विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या भाषणामुळे ही सभा चांगलीच गाजली.
पुढे बोलतांना ना.पाटील म्हणाले की, आपल्याकडे विकासाचे मुद्दे आहेत त्यामुळे कुणावर टीका करायची गरज नाही. टीका करणाऱ्यांनी त्यांची औकात पहावी, ज्यांनी साधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढली नाही त्यांना खा.प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करायचा अधिकार नाही असेही ना.पाटील म्हणाले. गेल्या ५० - ६० वर्षात जे झालं नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात करून दाखवलं. नोटबंदीतून भ्रष्टाचार नाहीसा करीत क्रांती केली. अबकी बार ४०० पार मध्ये प्रतापराव जाधव राहतील आणि यावेळेस त्यांची लीड आधीपेक्षा जास्त राहील असेही ना.गुलाबराव पाटील म्हणाले.
Advt.👆
खा.प्रतापराव जाधव यांनी गत १० वर्षातील विकासकामांचा लेखाजोखा सादर केला. खामगाव जालना रेल्वेमार्ग, जळगाव जामोद मधून जाणारी अकोट खंडवा रेल्वेलाईन ह्या दोन्ही मार्गांचा विषय येत्या २ ते ३ वर्षात मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. नदीजोड प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या सिंचनक्षेत्रात ७० टक्क्यांपर्यंत वाढ होईल. आपण केलेल्या कामाच्या भरवश्यावर जनतेसमोर जात आहोत, मतदारसंघातील प्रत्येक गावांत कोट्यावधी रुपयांची कामे केल्याचे ते म्हणाले.
आ. संजय गायकवाडांचे भाषण तुफान गाजले..
यावेळी आ. संजय गायकवाड यांचे भाषण तुफान गाजले. भाषणातून त्यांनी चौकार, षटकारांची आतषबाजी केली. आमदार म्हणून मोताळा तालुक्यात केलेल्या कामांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. याशिवाय विरोधी उमेदवारांची चांगलीच खरडपट्टी केली. काही अपक्षांना वाटत आपण निवडून येऊ, ती सोपी गोष्ट नाही, आपण ४ वेळा अपक्ष विधानसभा लढलो ४० हजार मतांच्या वर गेलो नाही इथे तर ६ विधानसभा मतदारसंघ आहेत असे म्हणत त्यांनी अपक्ष उमेदवार जिंकूच शकत नसल्याचे सांगितले. खा.प्रतापराव जाधव यांच्यावर काही जण खालच्या पातळीवर टिका करत आहेत त्यांना २७ तारखेनंतर पाहून घेऊ, गाठ माझ्याशी आहे असा इशारा त्यांनी दिला.