राजकारणात सगळ काही सहजासहजी होत नाही,मग विधानसभेचे सदस्य असलेल्या आमदार संजय गायकवाडांच्या पाठीमागे संसदेच चित्र?

मुख्यमंत्री शिंदेच्या आशीर्वादाशिवाय हे कसं शक्य आहे? आमदार गायकवाडांची " पाऊले चालती लोकसभेची वाट"!

 

बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "आमदार संजय गायकवाडांच्या लोकसभा उमेदवारीचे संकेत.." या मथळयाखाली वृत्त सर्वप्रथम बुलडाणा लाइव्ह  ने प्रकाशित केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे खरचं झाले तर केवळ इतर पक्षातील संभाव्य उमेदवारच नव्हे तर दस्तरखुद  खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह  १५ लाखांवर मतदारांसाठी सुद्धा हा अनपेक्षित धक्का असेल..कारण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वतः खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय गायकवाड यांना आमदार करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती..मात्र आता गेल्या तीन - साडेतीन वर्षांत बरच काही झालंय..त्यामुळे आमदार संजय गायकवाडांच्या कार्यालयाकडून त्यांच्या लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत मिळत असतील तर याचा अर्थ  काहीतरी "अंदर की बात"  ठरलीच असेल. कारण मुख्यमंत्री शिंदे यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आमदार गायकवाड यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयाकडून  असे संकेत दिल्याच गेले नसते असं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे..

                              जाहिरात👆

विद्यमान खासदार प्रतापराव जाधव बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा खासदार आहेत. २००९ ते २०१९ अशा तीन निवडणुका ते अपराजित राहिलेले आहेत. २०२४ ची लोकसभेची निवडणूक त्यांची चौथी निवडणूक राहील, मात्र यावेळेसचा पक्षांतर्गत सर्व्हे खा.जाधव यांच्यासाठी फारसा अनुकूल नसल्याचे वृत्त आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत सत्तेत असताना तेव्हा विरोधात असलेल्या भाजपने बुलडाणा लोकसभेच्या तयारीला जोरदार सुरुवात केली होती, मात्र एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेने भाजपची साथ पकडल्यानंतर सध्यातरी भाजपने दोन पावले माघार घेतल्याचे वरवर दिसत आहे.अशा स्थितीत विद्यमान खा.प्रतापराव जाधव हेच महायुतीच्या उमेदवारीचे दावेदार दिसत असले तरी पर्यायी उमेदवार म्हणून बुलडाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनाही पक्षश्रेष्ठींनी तयारी करण्याचे सांगितले असावे असेच एकंदरीत सध्या घडत असलेल्या घडामोडींवरून दिसते.

  खा. प्रतापराव जाधव यांच्यापुढे आव्हान..?

   आमदार संजय गायकवाड मुख्यमंत्री शिंदेच्या अतिशय जवळचे आहेत. आपल्या विधानांनी विरोधकांना उरून पुरणारा नेता अशी आमदार गायकवाडांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे माध्यमांत देखील आमदार गायकडांच्या संबधित बातम्यांना टीआरपी आहे. याशिवाय बुलडाण्यात गेल्या काही वर्षांत त्यांनी  कोट्यवधी रूपयांचा निधी खेचून आणलाय. चार टर्म आमदार असणाऱ्या आमदार संजय रायमुलकरांना मेहकरात जेवढी कामे जमली नाहीत त्यापेक्षा दुप्पट वेगाने आमदार गायकवाडांची झपाटल्यागत कामे सुरू आहेत.आधी मेहकरात ठरलेला शासन आपल्या दारी कार्यक्रम आमदार संजय गायकडांनी ताकद लावून बुलडाण्यात घडवून आणला. पुत्र कुणाल गायकवाड यांनाही प्रमोट करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. शिवसेनेत उठाव झाल्यानंतर आधी बुलडाणा विधानसभा मतदारसंघ एवढेच कार्यक्षेत्र असलेल्या आमदार गायकवाडांना जिल्हा संपर्क प्रमुख करून जिल्हाभर फिरण्यासाठी वाट मोकळी करून देण्यात आली, अर्थात हा निर्णय त्यावेळी उगाच घेतला गेला नसावा हे आता घडत असलेल्या घडामोडींवरून दिसत आहे.ज्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाडांना आमदार करण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली त्या खा. प्रतापराव जाधव यांच्यापुढेच आता आ.गायकवाड यांच्याकडून पक्षांतर्गत आव्हान उभे केले जाण्याची शक्यता आहे..

लोकसभेची वाट....

गेल्या दोन दिवसांपासून आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाकडून ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभेचे सदस्य असलेल्या आमदार गायकवाडांच्या पाठीमागे संसद भवनाचे चित्र..संसद भवनाकडे जाणारी वाट, वर बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो आणि त्यावर "जिल्ह्याच्या विकासासाठी सदैव तत्पर" असे लिहिलेले पोस्टर समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत..आमदार संजय गायकवाड यांनी यावर अजून जाहीरपणे भाष्य केले नसले तरी त्यांनी लोकसभेच्या वाटेवर जाण्याची तयारी केल्याचे दिसत आहे..!!