ना. भुपेंद्र यादवांवर आता भाजपने दिली राज्य प्रभारीपदाची जबाबदारी ! जिल्ह्यातल्या भाजप नेत्यांकडून नियुक्तीचे स्वागत ; ना. यादवांचे बुलडाण्याशी विशेष नाते! बुलडाणा लोकसभेचे होते प्रभारी
Jun 20, 2024, 17:53 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेल्या आणि 'चारसो पार' करण्यात अपयशी ठरलेल्या भाजपाने चालू वर्षात होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची आत्तापासूनच तयारी चालविली आहे.महाराष्ट्रासह चार राज्यांच्या प्रदेश निवडणूक प्रभारी आणि सह प्रभारींची नुकतीच करण्यात आलेली नियुक्ती या पूर्वतयारीचा एक भाग आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश प्रभारी पदी बुलडाणा जिल्ह्याला सुपरिचित केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आल्याने बुलडाणा जिल्हा भाजपाकडून स्वागत करण्यात आले असून नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. त्यामुळे या नियुक्तीचे भाजप वर्तुळात स्वागत झाल्याचे चित्र आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि दिल्ली स्थित मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी चार राज्यांच्या विधानसभा प्रदेश प्रभारींची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्याचे विधानसभा प्रभारी आणि सह प्रभारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसला आहे. यामुळे हादरलेल्या भाजपाने चालू वर्षाच्या अखेरीस होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतल्याचे मानले जात आहे. यामुळे प्रभारी पदी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .त्यांच्या जोडीला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना प्रदेश सह प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे. या दोन दिग्गज नेत्यांवर महाराष्ट्र ची जवाबदारी सोपविण्यात आल्याने भाजप राज्याबाबत किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.
बुलडाण्याशी संबंध..
दरम्यान प्रदेश प्रभारी भूपेंद्र यादव यांच्याशी बुलडाणा जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचे जवळचे संबध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अतिशय जवळीक आणि परिश्रमी- अभ्यासू नेता अशी भूपेंद्र यादव यांची ओळख आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणूक पूर्वी त्यांच्यावर बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जवाबदारी टाकण्यात आली होती. महाराष्ट्रात तेंव्हा बहुचर्चित ठरलेल्या भाजपच्या मिशन -४५ मध्ये बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला होता. बुलडाण्यावर भाजपचा तेंव्हापासून डोळा होता.दूरवरच्या भुपेंद्र यादव यांनी हे आव्हान पेलून बुलडाणा लोकसभा मतदारसंघात तब्बल पाचवेळा 'प्रवास' केला होता. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघ यादव यांनी पिंजून काढला.
यादवांची पायाभरणी सेनेच्या पथ्यावर..!
बुलडाणा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला सहजासहजी देण्याच्या मनस्थितीत नसलेल्या जिल्हा भाजपा मध्ये त्यांनी आत्मविश्वास, उत्साह निर्माण केला. बहुतेक दौऱ्यात मुक्कामी राहणाऱ्या या नेत्याने मतदारसंघातील सर्व समाज घटक, नागरिक ( मतदार) यांच्याशी थेट संवाद साधला होता. तसेच केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांच्या अमलबजावणी वर लक्ष ठेवत त्यांनी जिल्हा प्रशासनालाही कामाला लावले होते. अखेरच्या टप्प्यातील विकसित भारत संकल्प यात्रा अभियान त्यांनी प्रभावीपणे राबविले.भाजपाचे घर घर चलो अभियान आणि सोबतच कमळ चिन्ह मतदारसंघातील गावखेड्यात आणि मतदान केंद्रापर्यंत पोहोचविले. यामुळे जिल्हा भाजपने अखेरच्या टप्प्यापर्यंत बुलडाणा लोकसभा मतदारसंघावरील आग्रही दावा कायम ठेवला. याशिवाय नकारात्मक सर्वेक्षण चे 'राजकीय हत्यार' वापरत शिवसेना शिंदे गट आणि पर्यायाने खासदार प्रतापराव जाधव यांना दडपणात ठेवण्यात तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री भुपेंद्र यादव यशस्वी ठरले होते. अखेर बुलडाणा लोकसभा मतदारसंघ शिंदेगटाला सुटला. मात्र त्यांनी जिल्हा भाजपात निर्माण केलेली जिद्द, निर्धार आणि आत्मविश्वास महत्वाचा ठरला. तसेच भाजपा ची ताकद असलेल्या जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते, याच मतदारसंघात मिळालेल्या भक्कम मताधिक्यामूळे युतीचे प्रतापराव जाधव हे विजयी झाले, हे येथे उल्लेखनीय.
भाजपच्या मतदारसंघांनी ना. जाधवांना तारले..
शिंदे गटाचे आमदार असलेल्या बुलडाण्यात ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मताधिक्य तर मेहकर मध्ये जाधव यांना जेमतेम २७३ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादी ( अजितदादा गट) चे प्राबल्य असलेल्या सिंदखेडराजा मध्ये युती माघारली. चिखलीत युतीला मताधिक्य मिळाले नाही. अखेर यादव यांनी केलेली पाया भरणी शिंदे सेनेच्या पथ्यावर पडली असे म्हणता येईल.
त्यामुळे नामदार यादव जिल्हा भाजपात आदराचे स्थान मिळवू शकले आणि आमदार, पदाधिकारी यांच्यासाठी अविस्मरणीय ठरले. जिल्हा भाजपामध्ये त्यांच्या नियुक्तीने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणूकीत तिकीटवाटपासह बारीक सारीक नियोजनात भूपेंद्र यादव यांची महत्वाची भूमिका राहणार असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत..