घेराव आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ११ जणांचे नोड्यूल्स प्रमाणपत्र दिले पण... काशिनाथअप्पा बोंद्रेंना नोड्यूल्स प्रमाणपत्र दिलेच नाही!  प्रशासक साबळेंनी सांगितले "हे" कारण! 

बोंद्रे कुटुंबीय म्हणाले हा रडीचा डाव, निवडणुकीच्या मैदानात या
 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजकारण चांगलेच रंगात आले आहे.  घेराव आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी काशिनाथआप्पा बोंद्रे वगळता इतर ११ जणांचे नोड्यूल्स प्रमाणपत्र व लायसन्स देण्यात आले. मात्र काशिनाथअप्पा बोंद्रेंना प्रमाणपत्र न देण्यात आल्याने बोंद्रे कुटुंबीय व  काँग्रेसकडून निषेधाचे सुर उमटत आहेत. काशिनाथ अप्पा बोंद्रे यांचा पराभव करता येऊ शकत नाही हे माहीत असल्याने प्रशासनाला हाताशी धरून सत्ताधाऱ्यांनी हा रडीचा डाव रचल्याचा आरोप कुणाल बोंद्रे व जय बोंद्रे यांनी केला आहे.
 

दरम्यान प्रशासक श्री. साबळे यांनी काशिनाथआप्पा बोंद्रेंना नोड्यूल्स प्रमाणपत्र देताच येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याविरोधातील वसुलीचे  प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमच्याकडे बोंद्रे यांनी नोड्यूल्स प्रमाणपत्राची मागणी केली तेव्हाच आम्ही न्यायाधिकरणाला त्याबाबतचे पत्र दिले,मात्र न्यायाधिकरणाने आम्हाला अजून पर्यंत काशिनाथआप्पा बोंद्रे यांना नोड्यूल्स देण्याचे आदेश दिले नाहीत असे श्री. साबळे यांनी सांगितले.
     
पैसे आमच्याकडे जमा पण स्विकारण्याचे आदेश नाहीत..!
   
  आपण ६ लाख रुपये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खात्यात आरटीजीअस केले आहेत. आमच्याकडे जर थकबाकी असेल तर त्यातून काढून  घ्यावी असे काशिनाथआप्पा बोंद्रेंनी म्हटले होते. त्यावर आमच्याकडे पैसे आलेले असले तरी आम्ही ते स्विकारले नाहीत, कारण न्यायालयाने आम्हाला तसे आदेश दिले नाहीत असे प्रशासक श्री. साबळे यांनी सांगितले.
      
हा रडीचा डाव! मैदानात या..
   
आम्हाला १० दिवस नोड्यूल्स प्रशासनाने दिले नाहीत. आज त्यांना सुबुद्धी मिळाली. इतर लोकांना त्यांनी तातडीने प्रमाणपत्राचे वाटप केले मग आम्हाला का इतके दिवस दिले नाही असा सवाल यावेळी कुणाल बोंद्रे यांनी माध्यमांशी बोलताना केला. काशिनाथअप्पा बोंद्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात पराभूत करता येणार नाही म्हणून त्यांना प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ होत असल्याचे कुणाल बोंद्रे म्हणाले. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आहेत. हा रडीचा डाव आहे. असा कुटील डाव खेळल्यापेक्षा विरोधकांनी निवडणुकीच्या मैदानात आमच्याविरोधात यावे, फैसला जनतेच्या न्यायालयात होईल. काहीही झाले तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही आमचाच विजय होईल असेही कुणाल बोंद्रे म्हणाले.