निर्धार परिवर्तन यात्रेचा सिंदखेडराजा तालुक्यात धूमधडाका; रविकांत तुपकर म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना देश पातळीवर महत्व प्राप्त करून देणे हेच उद्दिष्ट...
Updated: Mar 7, 2024, 17:28 IST
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):- निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पावन भूमीत येऊन जिजाऊंच्या चरणी माथा टेकवल्याने धन्य झालो आहे. जिल्ह्यातील सिंदखेडराजा, लोणार, शेगाव हे खऱ्या अर्थाने जिल्ह्याची ओळख आहे. परंतु येथील विकास रखडून पडला आहे. जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून देणे हेच उद्दिष्टे आहे, त्यासाठी येणाऱ्या लोकसभेत परिवर्तन गरजेचे आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकरांनी सिंदखेडराजा तालुक्यात बोलतांना केले.
रविकांत तुपकर यांची निर्धार परिवर्तन यात्रा सिंदखेडराजात पोहोचली आहे. स्वराज्यजननी राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांचे दर्शन घेऊन ४ मार्च रोजी निर्धार परिवर्तन यात्रेच्या ११ व्या दिवसाची सुरुवात केली. सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव, नशिराबाद, आंचली, नाईकनगर, डावरगाव, वसंतनगर, दत्तापुर, धांदरवाडी, भोसा, सेलू, वर्दडी, बुट्टा, धानोरा, देवखेड, चांगेफळ, रुम्हणा व महारखेड या गावांमध्ये पोहचून रविकांत तुपकरांनी गावकऱ्यांशी संवाद साधला. ठिकठिकाणी नागरिकांनी मोठ्या प्रेमाने यात्रेचे जोरदार स्वागत केले. रात्री महारखेड येथे सभा आयोजित करण्यात आलेली होती. परंतु सर्व गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधण्यात मध्यरात्री झाली. मात्र मध्यरात्रीही महारखेड येथे झालेल्या सभेला मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.
ही उपस्थिती खूप मोठे बळ देणारी आहे, असे यावेळी तुपकरांनी म्हटले जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या या तालुक्यातील लोकांचा प्रतिसाद आणि पाठिंबा पाहून माँसाहेबांनी स्वतःच आशीर्वाद दिल्याची भावना मनात आली आणि कृतकृत्य झालो. सर्वसामान्य जनतेची साथ आणि जिजाऊंचे आशीर्वाद देऊन आता आपल्याला लोकसभेचा गड काबीज करायचा आहे. ही लढाई माझी एकट्याची नसून सर्वसामान्य जनता, कष्टकरी शेतकरी, शेतमजूर, तरुण अशा सर्वांचा हा लढा आहे. गावा गावातील तरुण, नागरिक आणि कार्यकर्ते आता पेटून उठले आहेत. सर्वसामान्यांची ही ताकद आता जिल्ह्यात परिवर्तन घडविणार असा विश्वास दर्शविणारी आहे. जिजाऊंच्या या जिल्ह्यात सर्वसामान्यांच्या हिताचा विकास साधण्यासाठी जिजाऊंची प्रेरणा आणि आशीर्वाद घेऊन आपण परिवर्तनाचा हा लढा यशस्वी करू, असे प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.