नरेश शेळके म्हणाले,काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नेतृत्वातचं चिखली शहर उंच भरारी घेईल! मविआच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे मतदारांना केले आवाहन...
Nov 24, 2025, 09:59 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचार दिवसेंदिवस जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी चिखली शहरात आयोजित कार्यकर्ता मेळावा व प्रचार सभेत महत्त्वपूर्ण भाष्य केले. काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नेतृत्वातचं चिखली शहर निश्चितच उंच भरारी घेईल. विकास, प्रामाणिकपणा आणि सर्वसमावेशक निर्णयक्षमता यांचा सुंदर मेळ म्हणजे बोंद्रे यांचे नेतृत्व, अशा शब्दात त्यांनी विश्वास व्यक्त केला.
शेळके यांनी आपल्या भाषणात प्रियाताई बोंद्रे यांच्या मागील कार्यकाळाची सविस्तर आठवण करून दिली. पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा, शहरातील स्वच्छता उपक्रम, रस्ते-विकास, नागरी सुविधांचा विस्तार, क्रीडांगण व शैक्षणिक सोयीसुविधांचा वाढलेला दर्जा, तसेच लोकाभिमुख निर्णय ही बोंद्रे परिवारच्या कामाच्या शैलीची वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान कार्यकर्त्यांपासून स्थानिक वॉर्डातील नागरिकांपर्यंत सर्वांनी काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या नेतृत्वाला समर्थन देत जयघोष केला. विविध सामाजिक घटकांकडूनही मविआच्या उमेदवारांबाबत सकारात्मक चर्चा होत असल्याचे चित्र दिसले.
मविआचे सर्व उमेदवार अभ्यासू, तळमळीचे आणि प्रामाणिक काम करणारे
या सभेत नरेश शेळके यांनी मतदारांना थेट आवाहन करताना सांगितले की, सिद्ध नेतृत्वाला बळ देण्यासाठी प्रभागनिहाय महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणे गरजेचे आहे. नेत्याला ताकद मिळते ती सक्षम नगरसेवकांमुळे. मविआचे सर्व उमेदवार अभ्यासू, तळमळीचे आणि प्रामाणिक काम करणारे आहेत. त्यांना निवडून दिल्यास चिखलीचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.