डोंगरी भागाच्या विकासासाठी ना.प्रतापराव जाधवांचा पुढाकार ! राहिलेल्या गावांचा समावेश डोंगरी विकास कार्यक्रमांत करण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना; "या" ५ तालुक्यांना मिळणार प्रत्येकी १ कोटी...
Aug 1, 2024, 16:39 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्यातील डोंगरी भागातील राहीलेल्या गावांचा समावेश डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये करा अशा सूचना केंद्रीय आयुष ,आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्या आहेत.
बुलडाणा जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली . या बैठकीदरम्यान विविध विकास निधीचा आराखडा मांडण्यात आला. यावेळी डोंगरी विकास कार्यक्रमा अंतर्गत जिल्ह्यातील अनेक डोंगर भागातील गावांचा समावेश या डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेला नसल्याची बाब ना.जाधव यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली . जी डोंगरी भागातील गावे या विकास आराखड्यात नमूद करण्यात आली नाही त्याचा नव्याने समावेश करावा या संदर्भाचा ठरावही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत खामगाव, बुलडाणा, जळगाव जामोद, संग्रामपूर, मोताळा या पाच तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी रूपयांचा निधी प्राप्त होणार आहे. या निधीतून समाविष्ठ गावात अनुज्ञेय कामे करण्यात येणार आहे. यातून २५ टक्के निधी अंगणवाडीची कामे आणि २५ टक्के निधी शिक्षण वर्गखोली बांधकाम व दुरूस्तीसाठी राखीव निधी राहणार आहे. तसेच आदिवासी उपयोजनेतून १८ कोटी, तर १०० कोटी रूपयांचा निधी अनुसूचित जाती उपयोजनेतून मिळणार आहे.
जिल्ह्यातील डोंगरी भागाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राहीलेल्या गावांचा समावेश होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार प्रशासनातील अधिकाऱ्यांना डोंगरी भागातील राहीलेल्या गावांचा समावेश डोंगरी विकास कार्यक्रमामध्ये करा अशा सूचना केंद्रीय आयुष आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत दिल्या आहेत ...