खासदार, आमदारांना कोरोनाच्या नियमांची माफी?; विनामास्क कबड्डी स्पर्धेचे उद्‌घाटन अन्‌ तोबा गर्दी!!, परवानगी नसतानाही स्पर्धा होते कशी, सामान्यांचा सवाल

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याभोवती कोरोनाने फास आवळला आहे. उपचार घेणाऱ्यांचीच संख्या दोन हजार पार गेली आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांचे पालन करण्याची सक्‍ती केवळ सामान्यांनाच आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राजकीय नेते सर्रास या निर्बंधांना पायदळी तुडवताना दिसत आहेत. गर्दीच्या कार्यक्रमांना हजेरी लावून राजकीय नेतेमंडळी विनामास्कचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याने त्‍यांचा आदेश शिरसावंद्य मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाही नियम मोडण्यास हे फोटो उद्युक्‍त करणारे ठरले तर आश्चर्य वाटण्यासारखे नाही...


जिल्हा परिषदेच्या कारभाऱ्यांचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपत असल्याने त्याआधी भूमिपूजन सोहळे उरकण्यावर सध्या नेत्यांचा जोर आहे. अशा कार्यक्रमांना गर्दीच नसेल तर नेत्यांचा हेतूच साध्य होत नाही. त्यामुळे कोरोना वाढत असतानाही भरगच्च गर्दीचे कार्यक्रम घेतले जात आहेत. गर्दीत नेते मास्क गळ्यात अडकवून ठेवतात. त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करतात. लोकप्रतिनिधींनी खरेतर जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. कारण त्‍यांचे अनुकरणच कार्यकर्ते करत असतात. त्‍यामुळे त्‍यांनीच पुढाकार घेऊन कोरोनाविषयक नियम पाळले तर समाजातही चांगला संदेश जातो.

काल, २१ जानेवारीला रात्री मेहकर तालुक्यातील अकोला ठाकरे येथे कब्बडी स्पर्धेच्या उद्‌घाटनाला खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमूलकर यांनी हजेरी लावली. यावेळी खेळाडू, नेते, प्रेक्षक कुणीही मास्क लावलेले दिसले नाही. शेकडोंच्या संख्येने गर्दी होती आणि त्याचे फोटोही खासदार जाधव यांच्या सोशल मीडियावर खात्यावरून शेअर झाले. एवढी गर्दी, त्‍यात नेते, कार्यकर्ते सारेच विनामास्क असूनही वृत्त लिहीपर्यंत तरी कारवाई झालेली नाही. शासनाने सध्या सर्वच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांना बंदी घातली आहे. मात्र राजकीय नेत्यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धा जिल्ह्यात सर्रास सुरू आहेत. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा सवाल व्यक्‍त होत आहे.

हेही होते कार्यक्रमाला...
अकोला ठाकरे येथे कर्मवीर स्व. पंजाबरावजी जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित भव्य दणदणीत कबड्डीच्या सामन्यांचे उद्‌घाटन खा. जाधव आणि मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माधवराव जाधव, सुरेशराव वानखेडे, दिलीप देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, युवा नेते योगेश जाधव, निरज रायमूलकर, भुजंगराव म्हस्के, समाधान साबळे, सुरेश काळे, किशोर गारोळे, भूषण घोडे, आयोजक विष्णू पाटील ठाकरे, बाळराजे ठाकरे, कैलास ठाकरे, मोहन ठाकरे, प्रशांत साबळे व त्यांचे सर्व सहकारी सरपंच- उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेना- युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्ते व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.