राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी आमदार श्वेताताईंचे योगदान महत्त्वाचे! अ. भा. क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेन्द्रसिंह राजपूत यांचे गौरवोद्गार! श्वेताताई महाले यांना दिला जाहीर पाठिंबा...

 
 चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या पाच वर्षात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेताताई महाले यांनी जनतेच्या प्रश्नाला जो न्याय दिला व ज्याप्रमाणे मतदारसंघाचा विकास केला त्यामुळे प्रभावित होऊन अखिल भारतीय क्षत्रिय महासभेने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असलेल्या आ. श्वेताताई महाले यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. दि. २ नोव्हेंबर रोजी आपल्या पाठिंबाचे पत्र क्षत्रिय महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. श्वेताताई महाले यांची समक्ष भेट घेऊन त्यांना सोपवले. 
 अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबर रोजी आ. श्वेताताई महाले यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटी प्रसंगी आ. महाले यांनी केलेल्या विकासकार्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत राजपूत समाजाकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी श्वेताताईंनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल अखिल भारतीय राजपूत महासभेच्या वतीने श्वेताताई महाले यांच्या उमेदवारीचे जाहीर समर्थन करणारे पत्रक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह राजपूत यांच्या सहिनिशी देण्यात आले. या पाठिंबाच्या पत्रकावर प्रदेश उपाध्यक्ष चंद्रशेखर राजपूत, अमरावती जिल्हाध्यक्ष अनुपसिंह राजपूत, बुलढाणा जिल्हाध्यक्ष गोकुळसिंह राजपूत व अन्य पदाधिकाऱ्यांच्या देखील स्वाक्षऱ्या आहेत. राजपूत समाजाच्या उन्नतीसाठी आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे योगदान उल्लेखनीय आहे असे गौरवोद्गार यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे प्रदेशाध्यक्ष राजेन्द्रसिंह राजपूत यांनी काढले..