आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या; शेतजमीन बळकावल्याचा ठपका! न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल..

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असतात. वाघाची शिकार करून दात गळ्यात अडकवल्याचे विधान केल्याने दोन दिवसांपूर्वी त्याच्याविरोधात वन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असताना त्यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. बुलडाणा मोताळा रस्त्यावरील आ. गायकवाड यांच्या मालकीच्या कथित वादग्रस्त शेतजमिनीवरून ते अडचणीत आले आहेत. अनेक दिवसांपासून संबधित प्रकरण न्यायप्रविष्ट होते, अखेर मोताळा न्यायालयाने आदेश दिल्याने बोराखेडी पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यासह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
                            Add.
बुलडाणा मोताळा रस्त्यावरील राजूर शिवारातील आपल्या मालकीच्या शेतजमिनीवर आ.गायकवाड यांनी जबरदस्तीने ताबा घेतल्याची तक्रार नागपूर येथील रिटा उपाध्याय या महिलेने केली होती. याच कथित वादग्रस्त शेतजमिनीवर आ.गायकवाड यांनी आलिशान फार्महाऊस बांधले आहे. याआधी देखील हे प्रकरण चांगलेच गाजले होते, संबधित महिलने माध्यमांसमोर येत आ. गायकवाड यांच्यावर आरोप केले होते. दरम्यान तक्रारदार महिलेने न्यायालयात दाद मागितली होती. अखेर मोताळा न्यायालयाने बोराखेडी पोलिसांना या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशावरून आ.संजय गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे तसेच ज्ञानेश्वर वाघ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.