आमदार डॉ. राजेंद्र शिंगणेंमुळे महाविकास आघाडीला जिल्ह्यात बूस्टर डोस! जिल्हाभरात होणार फायदा...
घाटावर चार तर घाटाखाली तीन असे एकूण सात विधानसभा मतदारसंघ बुलडाण्यात आहेत. त्यापैकी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा कायम चर्चेत राहिला आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे आणि सिदखेडराजा हे समीकरण १९९५ पासून कायम आहे. अर्थात २०१४ चा एकमेव अपवाद त्याला आहे.(त्यावेळी डॉक्टर शिंगणे हे निवडणूक रिंगणातच नव्हते) २०२४ च्या निवडणुकीसाठी डॉ. राजेंद्र शिंगणे हे अजित दादांची साथ सोडून पुन्हा एकदा पवार साहेबांकडे परततील अशा चर्चा जोरात होत्या त्याच्यावर आज शिक्कामोर्तब झाले. वाय.बी. सेंटर मध्ये त्यांची झालेली भेट आणि तिथून बदललेली पुढची राजकीय समीकरणे महत्त्वाची मानली जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन, भाजपचे तीन आणि काँग्रेसचे एक तर राष्ट्रवादीचे एक असे सात आमदार आहेत. २०२४ मध्ये त्यापैकी कोण गड कायम राखेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी व तिसरी आघाडी, वंचित आणि अपक्षांचा जोर किती राहतो यावर देखील बरेच चित्र अवलंबून असणार आहे. डॉ.राजेंद्र शिंगणे मोठ्या पवारांकडे परतल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गटातील स्थानिक पदाधिकारी नाराज असल्याचेही समजते. मात्र डॉ.राजेंद्र शिंगणे सारखा मातब्बर नेता महाविकास आघाडीत सामील झाल्याने जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांमध्ये त्याचा फायदा हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना नक्कीच होणार आहे.सिंदखेडराजातील बोटावर मोजण्याइतक्या उबाठा नेत्यांचा अपवाद वगळता डॉ.शिंगणे यांच्या एन्ट्रीने जिल्हाभरातील महाविकास आघाडीचे इच्छुक खुश आहेत..