मेहकर-लोणार मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाणार! डॉ.ऋतुजा चव्हाण यांचे प्रतिपादन; म्हणाल्या,५ वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलून दाखवेल....

 
  
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या ३० वर्षांत मेहकर लोणार मतदार संघ ५० वर्षे मागे गेला आहे. विकासाची दृष्टी नसल्याने मेहकर आणि लोणारची ओळख मागास अशी झाली आहे. या मातीतच मी लहानाची मोठी झाली आहे, त्यामुळे इथल्या लोकांच्या गरजा, त्यांची जीवनपद्धती मी अनुभवली आहे त्यामुळे जनतेने संधी दिल्यास पुढच्या ५ वर्षांत मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करून दाखवेल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी तथा शेतकरी क्रांतिकारी संघटनेच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी केले.
मेहकर मतदारसंघातील नायगाव देशमुख, देऊळगाव सा, वडाळी, मोहना खु या गावांच्या गाव भेट दौऱ्यात ऋतुजाताई चव्हाण यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. ऋषांक चव्हाण यांचेसह वंचित बहुजन आघाडी तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.ऋतुजा चव्हाण म्हणाल्या की, राज्यात महायुती सरकारचा अतिशय गलथान कारभार सुरू आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप या सरकारने केले आहे. त्यामुळे या सरकारचा अंत करायचा हा निर्धार आता मेहकर-लोणार मतदार संघातील जनतेने केल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मायबाप जनतेने संधी दिल्यास पुढच्या वेळी कामांचा पाढा घेऊन तुमच्यासमोर येईल असेही त्या म्हणाल्या.