सोयाबीन-कपाशीवरील बैठक ठरणार रेकॉर्डब्रेक!
बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे सत्याग्रह आंदोलन गल्ली ते दिल्ली लक्षवेधी ठरलं! याचे प्रतिबिंब २४ नोव्हेंबरला आयोजित उच्चस्तरीय बैठकीत देखील उमटणार असून, शासनाचे सुसज्ज नियोजन लक्षात घेता ही बैठक सुद्धा सत्याग्रहाप्रमाणेच रेकॉर्डब्रेक ठरणार आहे! उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला एकदोन नव्हे तब्बल ९ मंत्री आणि ९ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित राहणार आहे. यामुळे २४ नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या मुहूर्तावर आयोजित ही बैठक आणखीनच लक्षवेधी व उत्सुकता गगनाला भिडविणारी ठरलीय!
१७ नोव्हेंबरच्या मुहूर्तावर नागपुरातील संविधान चौक व नंतर खाकीच्या दडपशाहीमुळे बुलडाण्यातील रविकांत तुपकरांच्या निवासस्थानी शिफ्ट झालेले व गाजलेले हे सत्याग्रह आंदोलन राज्यात गाजले. त्याचे पडसाद दिल्लीपर्यंत उमटले. तिसऱ्या दिवशी हिंसक ठरलेल्या या आंदोलनाची राज्य शासन व शेतकऱ्याविषयी संवेदनशील असणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी गंभीरपणे घेतली. त्यांच्या आदेशानुसार यशस्वी मध्यस्थी करणारे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दादांचा निरोप व २४ नोव्हेंबरच्या बैठकीचे आवतन एकाचवेळी दिले. या पार्श्वभूमीवर २४ नोव्हेंबरला मंत्रालयात होणारी ही बैठक चर्चेचा अन् तुपकरांच्या कौतुकाचा विषय ठरली. मात्र ही बैठक शासनाने किती गंभीर घेतली हे आज सोमवारी प्राप्त तपशीलावरून स्पष्ट झाले. यातून अजितदादांचा आवाका, विषयाचे गांभीर्य अन् त्यांची प्रशासकीय स्टाईल हे देखील स्पष्ट झाले.
अबब, किती हे मंत्री...
या बैठकीला दादांसह अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, कृषी मंत्री दादाजी भुसे, सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभू देसाई, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम, प्राजक्त तनपुरे यांना हजर राहण्याचे आदेश आहेत. "स्वाभिमानी'कार राजू शेट्टी, युवा नेते रविकांत तुपकर हे विशेष निमंत्रित आहेत. याशिवाय नियोजन, वित्त खात्याचे अप्पर मुख्य सचिव, पुनर्वसन व ऊर्जाचे प्रधान सचिव, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक, कृषी व अन्न पुरवठाचे सचिव, कृषी, सहकार विभागाचे आयुक्त, पणन संचालक याशिवाय अन्य सर्व संबंधित अधिकारी हजर राहणार आहे. या सर्वांनी पूर्ण तयारीनिशी बैठकीला वेळवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.