शेतकरी हक्कांसाठी बुलडाण्यात २ मे रोजी भव्य ट्रॅक्टर मोर्चा; पक्ष ,गट –तट, मतभेद बाजूला ठेवून हजारोंच्या उपस्थितीचे आवाहन –  शिवसेना (उबाठा) प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके..

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) – राज्यातील शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी बुलडाणा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)च्या वतीने दिनांक २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी केले आहे.
शेळके यांनी स्पष्ट केले की, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे अन्नदाता आज स्वतः उपाशी आहे. सलग दोन वर्षांतील नैसर्गिक आपत्ती, बाजारभावातील घसरण, व विमा कंपन्यांच्या थकव्या देयकांमुळे राज्यातील सुमारे ६८% शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार मांडूनही सरकार डोळेझाक करत आहे. हे सरकार निर्दयी आणि खोटारडे असल्याचा आरोप त्यांनी केला. शेळके यांनी या लढ्याला केवळ शेतकऱ्यांचा नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या भवितव्याचा लढा म्हणून संबोधले.
मोर्चात मांडण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:
  • सर्व शेतकऱ्यांची 100% कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा.
  • ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.
  • प्रमुख पिकांना उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा.
  • 2023 व 2024 च्या पीक विम्याचे थकबाकीचे पैसे तात्काळ द्यावेत.
  • तुषार व ठिबक सिंचनाच्या अनुदानाचे वाटप त्वरित करावे.
  • शेतमालावर आधारित उद्योगांना चालना द्यावी.
  • वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतांना तार कुंपण द्यावे.
  • शेतीसाठी वीज मोफत द्यावी व वीजबिल माफ करावे.
  • नाफेड खरेदी बंद झाल्यामुळे नुकसान झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांना रु. 2000 प्रति क्विंटल इतका भावफरक द्यावा.
या ऐतिहासिक मोर्चामध्ये सर्व शेतकरी, सामाजिक संघटना, राजकीय मतभेद विसरून सहभागी व्हावेत, असेही आवाहन यावेळी करण्यात आले.