मनोज कायंदेंना विजयी करा! सिंदखेडराजाच्या विकासाची जबाबदारी माझी आणि अजितदादांची ; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन ...

 
 सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मनोज कायंदे हेच महायुतीचे खरे उमेदवार आहेत. इथे आता भाकरी करपत चालली आहे, ती लवकर बदला..मनोज कायंदे या ३५ वर्षाच्या तुम्हाला प्रचंड मतांनी विजयी करीत सभागृहात पाठवा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले. काल,१२ नोव्हेंबरला सिंदखेडराजा मतदारसंघाचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या प्रचारार्थ छगन भुजबळ यांची प्रचारसभा पार पडली यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलतांना भुजबळ म्हणाले की, लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी राज्यात रान उठवले, ही योजना फसवी असून महिलांच्या खात्यावरील पैसे सरकार परत घेईल, असे सांगितले. पण निवडणूक लागली आणि विरोधकांची भाषा बदलली. महायुती सरकार पंधराशे देतात तर आम्ही तीन हजार देऊ म्हणून विरोधक आता सांगत फिरू लागले आहेत.
विरोधक लबाड आहेत. लबाडाच आवतन जेवल्याशिवाय खर नसतं त्यामुळे विरोधकांच्या शब्दावर आता जनता विश्वास ठेवणार नाही असेही भुजबळ म्हणाले. लाडकी बहीणच काय परंतु राज्यातील कोणतीच, कल्याणकारी योजना बंद होणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. आधी योजनेवर टीका आणि आता वाढीव रक्कम देण्याचं आश्वासन दिलं जात आहे. यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये असे सांगतानाच भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबतच्या विरोधकांच्या टीकेला देखील उत्तर दिले. आताही संविधान बदलणार असल्याचे विरोधक सांगत आहेत
मात्र, ही राज्याची निवडणूक आहे. विधानसभेत संविधान बदलता येते का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. केंद्रातील मोदी सरकार संविधान बदलणारे नाही तर संविधानाचा सन्मान करणारे आहे. संविधानासमोर नतमस्तक होणारे आहे असेही भुजबळ म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार असून शेतकऱ्यांसह सर्व समाज घटकाला दिलासा देणारे निर्णय हे सरकार घेईल. तुम्ही सिंदखेडराजा मतदारसंघातून मनोज कायदे यांना विजयी करा तुमच्या विकासाची जबाबदारी माझी आणि अजितदादांची असेही भुजबळ म्हणाले..