महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रभारी चेन्नीथालांचा बुलडाण्यात राज्य सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, हे सर्वाधिक भ्रष्ट सरकार;
प्रत्येक कामात ५० टक्के कमिशन! अल्पसंख्यांकांवर अत्याचार होत असल्याचा आरोप! बाळासाहेब थोरात म्हणाले, सरकार भ्रष्ट पायावर उभे! वडेट्टीवार म्हणाले, मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी...
Aug 13, 2024, 14:02 IST
बुलडाणा(अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला आज बुलडाण्यात आहे. अकोला बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते आढावा घेत आहेत. त्यांच्यासोबत बाळासाहेब थोरात विधान सभेची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील देखील आहेत. दरम्यान आज, बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत रमेश चेन्नीथाला यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनीदेखील राज्य सरकारच्या कामकाजाला आडव्या हाताने घेतले. महाराष्ट्र सरकार हे सर्वाधिक भ्रष्ट सरकार आहे. प्रत्येक कामासाठी ५० टक्के कमिशन घेण्यात येत असल्याचा घणाघात चेन्नीथाला यांनी केला. कमीशनखोरी तुम्ही बुलडाण्यातही पाहत आहात असेही चेन्नीथाला म्हणाले.
Advt 👆
शेतकरी संकटात आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सुटत नाहीत .महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहे. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घ्यायला राज्य आणि केंद्र सरकारकडे वेळ नाही. कर्जमाफी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही असेही रमेश चेन्नीथाला म्हणाले. बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतेही काम केंद्र आणि राज्य सरकारने केले नाही. सरकारच्या विरोधात मतदान करण्यासाठी जनता तयार असल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसले विधानसभा निवडणुकीत दोन तृतीयांश बहुमताने महाविकास आघाडी सत्तेत येईल असा विश्र्वासही चेन्नीथाला यांनी बोलून दाखवला. जागा वाटपाबाबत लवकरच बैठक होईल, महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत एकजुटीने काम करेल असेही ते म्हणाले.
अल्पसंख्यांकांवर अत्याचार...
देशात अल्पसंख्यांक समुदाय असुरक्षित आहे. अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार वाढत आहेत. केंद्र सरकारने वफ्फ बोर्डाच्या विरोधात बिल आणले, यावेळी संसदेत कोणतीही चर्चा झाली नाही. अल्पसंख्यांक समुदायाला विश्वासात घेण्यात आले नाही असा आरोप करीत अशा पद्धतीने अचानक विधेयक संसदेत आणणे चुकीचे असून त्यावर चर्चा अपेक्षित होती असे चेन्नीथाला म्हणाले.
बाळासाहेब थोरात म्हणाले...
यावेळी बोलताना काँग्रेसने ते बाळासाहेब थोरात म्हणाले की राज्य सरकारचा पायाच भ्रष्ट आहे. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंनी सत्ता स्थापन केली, त्या सत्तेत अजित पवार सामील झाले ही पद्धतच चुकीची आहे. केवळ पैसा उभा करण्यासाठी ते एकत्रित आले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे. शेतकरी अडचणीत आहे. शेतमालाचे भाव पडलेत मात्र शेती उत्पादनासाठी आवश्यक असलेले खते, औषधे याचे भाव मात्र वाढले आहेत. शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला राज्य सरकारकडे वेळ नाही असे थोरात म्हणाले.
विजय वडेट्टीवार म्हणाले...
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा खरपूस भाषेत समाचार घेतला. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी या शब्दात वडेट्टीवार यांनी या योजनेवर भाष्य केले. हे सरकार कमिशनखोर सरकार आहे, बुलडाण्यात देखील सौंदर्यीकरणाच्या नावाखाली
दादागिरी आणि कमिशनखोरी वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
समृद्धी महामार्ग झाला मात्र या महामार्गात कुणाची समृद्धी झाली असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांनी लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या बहिणीला पाडण्यासाठी बायकोला उभे केले त्यांना आता लाडक्या बहिणीची आठवण होत आहे. राज्य सरकारमध्ये शिंदे, फडणवीस आणि पवार यांच्यात "कोल्डवॉर " सुरू असून अधिकाधिक खाण्याची स्पर्धा लागली आहे. १० लाख कोटींच्या जागा अदानींच्या खिशात घालण्याचे काम झाल्याचा सनसनाटी आरोप वडेट्टीवार यांनी केला. सगळ्या बाबी आता जनतेच्या लक्षात आल्या असून विधानसभा निवडणुकीत जनता याचे उत्तर देईल असे वडेट्टीवार म्हणाले.