शेतकऱ्यांसाठी हजार गुन्हे दाखल होऊ द्या!- आ. श्वेताताई महाले

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत देत नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या भाजप नेत्यांवर सूडबुद्धीने पोलीस कारवाईचा बडगा उगारला जातो. चिखलीत आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी मोर्चा काढला. मात्र आघाडी सरकारच्या दबावामुळे पोलिसांनी माझ्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांविरुद्ध, शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले. शेतकऱ्यांसाठी असे एक काय तर हजार गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, असा घणाघात आमदार श्वेताताई महाले यांनी केला.

बुलडाणा येथे भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाला संबोधित करताना त्या बोलत होता. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही आम्ही कारवाईला घाबरणार नाही तुम्ही हजार गुन्हे दाखल करा, असे आव्हान राज्य सरकारला दिले. राज्य सरकारला शेतकऱ्यांची कीव नाही. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या भाजप नेत्यांसोबत राज्य सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे. मंत्र्यांचे कार्यक्रम होतात, वाढदिवस होतात. मात्र तिथे कोरोना पसरत नाहीत. शेतकऱ्यांसाठी लढताना कसा काय कोरोना पसरतो, असा सवालही श्वेताताईंनी केला.

खली येथे २५ ऑक्टोबर रोजी भाजपच्या वतीने चिखली तहसील कार्यालयावर भव्य आसूड मोर्चा काढला होता. मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी व महिला सहभागी झाल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून चिखली पोलिसांनी श्वेताताईंसह १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.