स्व.शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचा रविकांत तुपकरांना पाठिंबा;पत्रकार परिषदेत केली घोषणा! प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे म्हणाले, पूर्ण ताकतीने रविकांत तुपकरांच्या पाठीशी उभे राहणार...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): छोट्या भावाच्या मदतीला मोठा भाऊ धावून यावा याच पद्धतीने स्व.शरद जोशींची शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्यासाठी धावून आली आहे. आम्ही एकाच विद्यापीठातून घडलो आहोत, शेतकऱ्यांचे कल्याण हे आमचे एकच ध्येय आहे त्यामुळे आम्ही रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित बहाळे यांनी केली. 
   स्व.शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ( दि. १५ एप्रिल) बुलढाणा येथे पत्रकार परिषदेत लोकसभेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊनच रविकांत तुपकर शेतकरी चळवळीकडे वळले आहेत हे वास्तव आहे. रविकांत तुपकर यांची चळवळीची सुरुवातच शरद जोशी यांच्या संघटनेपासून आहे.
त्यामुळे आमचे सर्वांचे कुळ एकच आहे. शरद जोशी या एकाच विद्यापीठात आम्ही शिकलो, घडलो आणि तयार झालो आहोत. आमच्या संघटनेची नावे वेगवेगळी असली तरी आमची विचारधारा एक आहे, आमचं ध्येय एक आहे आणि लढाई देखील एकच आहे, त्यामुळे आम्ही रविकांत तुपकर यांना जाहीर पाठिंबा दिला असून संपूर्ण जिल्हाभर रविकांत तुपकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आमची संपूर्ण ताकद रविकांत तुपकर यांच्या प्रचारासाठी नव्हे तर विजयासाठी आम्ही लावणार आहोत, अशी माहिती यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ललित बहाळे यांनी दिली.आजची वेळ ही एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत बुलढाणा जिल्हा दुर्दैवाने दुसऱ्या क्रमांकावर आहे, शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटामध्ये अडकला असून आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर सर्वसामान्य जनतेसाठी गेल्या २२ वर्षांपासून लढा देणाऱ्या रविकांत तुपकर या शेतकरी चळवळीतील सच्चा कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. ही निवडणूक बुलढाणा जिल्ह्यपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यातील शेतकरी, कष्टकरी व शेतमजुरांच्या न्याय हक्काचा हा प्रश्न आहे, संपूर्ण राज्यातील शेतकरी चळवळीचा हा लढा आहे त्यामुळे “जनशक्ती विरुद्ध धनशक्ती”ची ही लढाई जिंकण्यासाठी आमची संघटना रविकांत तुपकर यांच्या सोबत आहे, असे यावेळी ललित बहाळे यांनी सांगितले. सर्व शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, तरुण, अल्पसंख्याक समाज तसेच शहरी जनता असे सर्वजण पूर्ण ताकदिने रविकांत तुपकर यांच्या पाठीशी उभे राहुन त्यांना विजयी करण्यासाठी घरच्या भाकरी खाऊन व स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून कामाला लागली आहे. त्यात आता स्व. शरद जोशींच्या शेतकरी संघटनेची देखील भर पडली आहे, त्यामुळे आता रविकांत तुपकर यांचा म्हणजेच पर्यायने सर्वसामान्य जनतेचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. या पत्रकार परिषदेला जेष्ठ नेते वामनराव जाधव, एकनाथ पाटील थुट्टे, देवीदास पाटील कणखर, नामदेवराव जाधव, समाधान कणखर, डॉ.विनायक वाघ आदी उपस्थित होते.