स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी आधार! आमदार श्वेताताई महालेंचे प्रतिपादन; चिखली विधानसभा मतदारसंघातील ६ मयत शेतकऱ्यांच्या वारसांना केले १२ लाख रुपयांचे वितरण

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काळ्या आईची सेवा करत आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला अनेक नैसर्गिक आपत्ती व अपघातांना तोंड द्यावे लागते तर कधी घातपात देखील घडतो. एखाद्या बिकट प्रसंगांमध्ये त्याला प्राण देखील गमाववे लागतात. अशावेळी त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते, या संकटाच्या काळात स्व. गोपीनाथजी मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संकटग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी मोठा आधार ठरते असे प्रतिपादन आ. श्वेताताई महाले यांनी केले. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या चिखली मतदारसंघातील सहा मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अनुदानाचे वाटप दि. ६ ऑक्टोबर रोजी आ. महाले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
  रस्ते अपघात, पाण्यात बुडून किंवा सर्पदंशाने मृत्यू झालेल्या शेतकर्‍यांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात आले. सोमठाणा येथील रस्ते अपघातग्रस्त शेतकरी दत्तू वाघमारे (वारस, पत्नी वर्षा वाघमारे), उत्रादा येथील अपघातग्रस्त रवींद्र इंगळे (वारस- पत्नी दीपाली इंगळे), पाण्यात बुडून मृत्यू पावलेले कोलारा येथील जीवन सोळंकी (वारस- वडील रवींद्र सोळंकी), सावंगी गवळी येथील अपघातग्रस्त निखिल रोकडे (वारस- शारदा रोकडे), सर्पदंशग्रस्त बोरगाव वसू येथील जाईबाई इंगळे (वारस- पती गुलाबराव इंगळे) या शेतकर्‍यांच्या वारसांना या वेळी अनुदान वितरित केले.
       असे आहे योजनेचे स्वरुप
             देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजपा शिवसेना महायुतीच्या सरकारने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली. ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे, असे सर्वच शेतकरी या योजनेच्या लाभासाठी अर्ज करू शकतात. मात्र, ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही म्हणजे ज्यांचे सातबाऱ्यावर नाव नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील आहे, तर अशा कुटुंबातील कोणताही एक सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा १० ते ७५ या वयोगटातील असावा. रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे, जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचूदंश, नक्षली हल्यात झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे - चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल आदी प्रकारामध्ये प्राण गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेमधून शासनाकडून मदत करण्यात येते. 
        यावेळी ज्ञानेश्वर सवडतकर तालुका कृषी अधिकारी, सुनील पोफळे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा,सुरेश सपकाळ, सरपंच रमेश इंगळे, नारायण पाटील, अशोक पाटील ,दिनेश लंबे मंडळ कृषी अधिकारी, विलास शेळके कृषी पर्यवेक्षक, गणेश इंगळे कृषी पर्यवेक्षक, विशाल वाघ कृषी साहाय्यक, काशिनाथ पवार कृषी सहाय्यक गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदींची या कार्यक्रमास उपस्थिती होती.