खा.प्रतापराव जाधव मुंबईतून दिल्लीच्या दिशेने रवाना..! मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबतही झाली बैठक; महत्वाच्या विषयांवर चर्चा...
Jun 6, 2024, 16:10 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खा.प्रतापराव जाधव यांनी चौथ्यांदा गुलाल उधळला. नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात आता खा. जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी निश्चित मानल्या जात आहे. त्यादृष्टीने खासदार जाधव यांच्याकडून प्रयत्न देखील सुरू झाले आहेत.
दरम्यान खा.प्रतापराव जाधव आज ६ जून रोजी मुंबईत दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक झाली. दुपारी दीड वाजता सुरू झालेली ही बैठक साडेतीन वाजेपर्यंत चालली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन केले. या बैठकीत केंद्रातील सत्तेच्या सहभागाबद्दल , त्यातील वाटाघाटीबद्दल चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.दरम्यान थोड्याच वेळापूर्वी खा.प्रतापराव जाधव दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. शिवसेनेचे सर्वच खासदार एका विशेष विमानाने दिल्लीत पोहचणार आहेत. दिल्लीत पोहचल्यानंतर सर्व खासदार नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत.