जयश्रीताई शेळकेंनी केली पोलिसांत तक्रार! म्हणाल्या, शिवसेना प्रवेशासंबधी केलेली पोस्ट प्रतिमा मलिन करण्यासाठी; पोस्टकर्त्याचा शोध घेण्याची केली पोलिसांना मागणी
Jul 23, 2023, 21:14 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव जयश्रीताई शेळके यांच्यासंबधी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. जयश्रीताई शेळके शिवसेनेत प्रवेश करणार होत्या, त्या मातोश्रीवर जाऊन आल्या, तिकिटाचे देखील फायनल झाले. मात्र स्थानिक शिवसेना नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन विरोध दर्शवल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला अशा आशयाची ती पोस्ट होती. दरम्यान याप्रकरणी वकील असलेल्या ॲड. जयश्रीताई शेळके यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
ॲड. जयश्रीताई शेळके यांच्या वतीने त्यांचे स्विय सहाय्यक कार्तिक संजय सवडतकर यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे. ॲड जयश्रीताई शेळके यांच्या शिवसेना प्रवेशासंदर्भात करण्यात आलेली पोस्ट पूर्णपणे खोटी व चुकीची आहे. जयश्रीताई शेळके यांची नाहक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ती पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे सदर पोस्ट तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले.