सत्तेची नशा भाजपच्या डोक्यात; बळीराजा पॅनलला मत देऊन भाजपला धडा शिकवण्याचे डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन!

राहुल बोंद्रे म्हणाले, विरोध नव्हे तर विरोधक संपवण्याचा भाजपचा डाव!  अमडापुरात महाविकास आघाडीची प्रचारसभा धडाक्यात
 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेल्याने ते मस्तवाल झाले आहेत. मनात येईल ते करायचे असे भाजपचे धोरण आहे. विरोधकांना संपविण्यासाठी ते कोणत्या थराला जातील याचा नेम नाही. सामान्य शेतकरी, शेतमजूर लोकांच्या हिताचे भाजपला काही देणे घेणे नाही. त्यांना केवळ सत्ता प्यारी आहे. त्यामुळे भाजपच्या मस्तवाल नेत्यांना धडा शिकवण्यासाठी कृषी उत्पन्न  बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला मतदान करण्याचे आवाहन माजी मंत्री तथा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. अमडापुर येथील बल्लाळदेवीचे आशीर्वाद घेऊन  महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, शेतकरी संघटनेचे एकनाथराव थुट्टे यांच्यासह चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
 

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ माजी संचालकांवर करण्यात आलेली ४० ब ची कारवाई सूडबुद्धीने व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही आ.डॉ.शिंगणे यांनी केला. विरोधकांना आपला पराजय दिसत आहे त्यामुळेच त्यांच्याकडून असले धंदे सुरू आहेत असे डॉ.शिंगणे यावेळी म्हणाले. त्यांनी कितीही काहीही केले तरी विजय आपलाच होईल कारण शेतकऱ्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे असेही आमदार डॉ. शिंगणे यावेळी म्हणाले.
    
विरोधक संपवण्याचा भाजपचा डाव त्यांच्याच अंगलट येणार: राहुल बोंद्रे

    राज्यात आणि केंद्रात सत्तेचा प्रचंड गैरवापर भाजपकडून सुरू आहे. विरोध नव्हे तर विरोधकांना संपविण्याचा घाट भाजपकडून घातल्या जातोय. मात्र हा डाव त्यांच्याच अंगलट येणार आहे. ११ माजी संचालकांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई करून आपल्याला निवडणूक जिंकता येईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल मात्र त्यांच्या भ्रमाचा भोपळा लवकर फुटेल आणि चिखलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचा दिमाखात विजय होईल असे राहुल बोंद्रे म्हणाले. विरोधकांना खोट्या केस मध्ये अडकवून प्रतिमा मलिन करण्याचा भाजपचा कावा आता ओळखा असेही ते म्हणाले.

नरेंद्र खेडकर म्हणाले, "ते" आमिष देतील पण...

   राज्यात खोके सरकार स्थापन झाल्यापासून विरोधकांना संपविण्यासाठी स्वायत्त संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला. भाजपवाले तुम्हा वेगवेगळे आमिष देतील, त्यांचा तो धंदाच आहे मात्र खोट्या आमिषांना बळी न पडता महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलला विजयी करा असे नरेंद्र खेडेकर म्हणाले.  शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे एकनाथराव थुट्टे यांनी शेतकरी संघटना महाविकास आघाडीच्या बळीराजा पॅनलच्या पाठीशी असल्याचे सांगत खोट्या भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन केले.