बुलढाण्यात काँग्रेसला केवळ "क्षणिक सुख"! माघार घेतलेल्या वंचितच्या उमेदवाराचा पूजाताई गायकवाडांना पाठिंबा! आ. गायकवाडांनी काँग्रेसचा केला करेक्ट कार्यक्रम?

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. दरम्यान बुलढाण्याचे राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. शिंदे सेनेच्या पूजा गायकवाड, भाजपच्या अर्पिता शिंदे आणि महाविकास आघाडीच्या लक्ष्मी काकस या ३ उमेदवारांमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे. दरम्यान काँग्रेसला टेन्शन देणारी बातमी समोर आली आहे, दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चिता हिरोळे यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेसला दिलासा मिळाला होता..मात्र काँग्रेससाठी हे क्षणिक सुख ठरले.. वंचितच्या उमेदवार अर्चना हिरोळे यांनी पुजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर करून धमाल उडवून दिली आहे..काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती, मात्र आ.गायकवाड यांनी यामागे मोठी राजकीय खेळी केल्याचे उघड झाले आहे.
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने बुलढाण्यात एकत्रित पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. काँग्रेसने लक्ष्मी काकस यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्यानंतर वंचित कडून अर्चना हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्चना हिरोळे यांनी माघार घेतल्याने काँग्रेसला तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र तो दिलासा म्हणजे काँग्रेससाठी केवळ "क्षणिक सुख" ठरले. अर्चना हिरोळे यांनी आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी सौ. पुजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. हा पाठिंबा व्यक्तिगत पातळीवरून आहे की पक्षीय पातळीवरून हे अद्याप समजले नसले तरी आ. गायकवाड यांनी काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे शहरात बोलले जात आहे.