आयाबहिणींची अब्रू सांभाळता येत नसेल तर खुर्च्या खाली करा! माजी जि.प सदस्य दिलीप वाघ यांची घणाघाती टिका; म्हणाले, ३० वर्षात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची वाट लागली;

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात निघाली मशाल यात्रा....

 

सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यात घोटाळेबाजांचे, खोकेबाजांचे सरकार आहे आया बहिणींची अब्रू राज्यात सुरक्षित नाही. दिवसाला बलात्काराच्या बातम्या येत आहेत. नाव शिवरायांचे घेता मग सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती प्रमाणे सरकार चालवायला पाहिजे, तुम्हाला आया बहिणींची अब्रू वाचवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा असा घणाघात शिवसेना ( उबाठा) चे माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप वाघ यांनी केला. दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची मशाल यात्रा निघाली आहे. मतदार संघातील गावागावात ही यात्रा जात आहे. दिनांक १५ सप्टेंबर रोजी तेजस्वी महाराज संस्थान वरुडी येथून या यात्रेला प्रारंभ झाला. जिल्हा सह संपर्कप्रमुख छगन मेहत्रे यांनी या मशाल यात्रेचे उद्घाटन केले.यावेळी आशिष रहाटे, किशोर गारोळे यांचीदेखील उपस्थिती होती.

२५ सप्टेंबर रोजी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीने सिंदखेड राजा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे निमंत्रण मशाल जागर यात्रेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी वरोडी, गुंज, सवडद, मोहाडी, रताळी, शिंदी, पिंपळगाव लेंडी, सावंगी भगत, तांदुळवाडी, गोरेगांव, उमनगाव, काटेपांग्री, सायाळा, लिंगा या गावांत मशाल यात्रेचे दमदार स्वागत झाले. प्रत्येक गावांत होणारी फटाक्यांची आतषबाजी, सगळीकडे दिसणारे भगवे झेंडे यामुळे मशाल यात्रेत एक वेगळाच माहोल तयार झाले. यावेळी गावागावांत झालेल्या कॉर्नर बैठकीत दिलीप वाघ यांनी स्थानिक आमदार डॉ.शिंगणे यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मतदारसंघाची वाट लावली...
 पुढे बोलत असताना दिलीप वाघ म्हणाले की, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची वाट लावण्याचे काम आमदार डॉ.शिंगणे यांनी केले आहे. जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा तेव्हा ते मंत्री झाले मात्र मंत्रिपदाचा फायदा मतदार संघाला झाला नाही. सिंदखेडराजा सारखे जागतिक पातळीवरील पर्यटन स्थळ असून देखील शहराचा विकास नाही.मतदार संघातील गावांच्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली आहे. शेतकऱ्यांसाठी पांंधन रस्ते नाहीत मग ३० वर्षात काय दिवे लावले? असा सवाल दिलीप वाघ यांनी केला. शरद पवारांना देव देव म्हणता अन् त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसता. जनतेला आता तुमची दुटप्पी भूमिका माहीत झाली आहे त्यामुळे यंदा जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असे दिलीप वाघ म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या माजी आमदारांना त्याची फळे भोगावे लागतील अशी टीकाही त्यांनी माजी आ.शशिकांत खेडेकर यांचे नाव घेता केली.
यावेळी बद्री बोडखे, महेंद्र पाटील, शिवाजी लहाने, सुनील बुंदे, संदीप चव्हाण, अनिल मेहेत्रे, दिलीप चौधरी, ओंकार चव्हाण यांच्यासह शिवसैनिकांनी यात्रेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.