केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती;बाधित गावांना भेट; म्हणाले, घाबरु नका, लवकरच निदान...

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगांव तालुक्यातील केस गळती आजाराच्या निदान व संशोधनासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरचे शास्त्रज्ञ दाखल होणार आहेत. लवकरच या आजाराचे निदान करुन योग्य उपचार केले जाईल घाबरुन नका, असे आवाहन आज केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. 
केस गळती आजाराने बाधित झालेल्या शेगांव तालुक्यातील पहुडजिरा, कालवड, कठोरा, भोंडगाव आणि बोंडगांव गावांना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेटी देवून पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बाधित रुग्णांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला. 
ते पुढे म्हणाले, केस गळती हा देशात पहिल्यांदाच समोर आहे. हा विचित्र आजार असला तरी घाबरुन जाऊ नका. या आजाराची केंद्र सरकारनेही घेतली आहे. या आजाराच्या निदान व संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि दिल्ली व चेन्नईचे आयुर्वेद, युनानी, ॲलोपॅथी व होमीयोपॅथीच्या तज्ञ डॅाक्टरांची टीम उद्या दाखल होणार आहेत. ते तपासणी करणार आहेत. ११ गावातील ३३ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील १४ पाणी नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असले तरी त्यामुळे केस जात नसल्याचे तज्ञांचे मत आहे. फंगल इन्फेक्शन नसल्याचेही कळते. स्कीन बायअप्सीचे चाचणी अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल लवकरच प्राप्त होईल, असे त्यांना सांगितले. 
अन्न व औषध प्रशासनाने बाधित गावातील घरगुती वापरातील शॅम्पू, तेल, साबनाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. शास्त्रज्ञांकडून निदान झाल्यानंतर बाधितांवर योग्य उपचार केले जाईल. सध्या बाधित गावांमध्ये आरोग्य यंत्रणा कार्यरत असून प्राथमिक उपचार केले जात आहेत. युद्धस्तरावर प्रयत्न सुरु आहे. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, लक्षणे आढळूण आल्यास आरोग्य यंत्रणेवर संपर्क साधा,असे आवाहन केले तसेच या प्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री सातत्याने लक्ष ठेवून आहेत. या आजाराशी लोणार सरोवरच्या पाण्याचा संबंध नसल्याचे निदर्शनास येते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अमोल गिते, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.