अन्यायाविरोधात पेटून उठायचंय, मशाल यात्रेत सहभागी व्हायचंय! तालुकाप्रमुख लखन गाडेकरांचे आवाहन
Updated: Sep 5, 2024, 10:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या नेतृत्वात आजपासून बुलडाणा विधानसभा मतदारसंघात मशाल यात्रा सुरू होत आहे. मोताळा येथून या यात्रेचा भव्य शुभारंभ होणार आहे. या मशाल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केले आहे. "अन्यायाच्या विरोधात पेटून उठुया, चला मशाल यात्रेत सहभागी होऊया." अशा शब्दात लखन गाडेकर यांनी आवाहन केले आहे.
ही मशाल यात्रा सोयाबीन कापसाच्या भावासाठी आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळवून देण्यासाठी आहे. पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या पदरात पाडून देण्यासाठी आहे. सरकारच्या धोरणांनी चोहीकडे अंधकार पसरला असताना ही मशाल यात्राच आता परिवर्तनाचा प्रकाश निर्माण करणार आहे असे लखन गाडेकर यांनी म्हटले आहे. आज दुपारी मोताळा येथून प्रारंभ होणाऱ्या मशाल यात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही गाडेकर यांनी केले आहे.