...अन् रेखाताईंच्या उपस्थितीने सारेच अचंबित!; राणे म्हणाले....
ताई लवकर विचार करा...
Updated: Oct 31, 2021, 20:56 IST
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली अर्बन बँकेच्या वतीने उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिर आज, ३१ ऑक्टोबरला चिखली येथे केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी जिल्ह्यातील भाजपचे तिन्ही आमदार, माजी आमदार तोताराम कायंदे व बुलडाण्याचेही माजी आमदारही उपस्थित होते. मात्र मंचावर उपस्थित चिखलीच्या माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर यांच्या उपस्थितीने सारेच आश्चर्यचकित झाले.
रेखाताईंच्या उपस्थितीबद्दल नारायण राणे यांनीही रेखाताईंना लवकर विचार करण्याचा सल्ला दिला. मी जिल्ह्यात आलो. मला बदल माहीत नव्हता. रेखाताई दिसत नाहीत म्हटलो, मात्र रेखाताई आल्या. मला इंटेरिअर डिझायनिंग आवडते. योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी असली पाहिजे. ताई योग्य ठिकाणी दिसल्या नाहीत म्हणून खंत वाटली. रेखाताई आमच्या कळपात शोभून दिसतात. त्यामुळे ताई लवकर विचार करा. विलंब लावू नका. मधला काळ अपघाताने गेला असे समजा. ताईंची तयारी आहे, असेही राणे यांनी रेखाताईंकडे पाहून म्हटले. आमदार संजय कुटे यांनीही आज रेखाताईंच्या उपस्थितीने आनंद वाटल्याचे सांगितले. त्यामुळे रेखाताई पुन्हा एकदा भाजपात घरवापसी करणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. सलग तीन वेळा चिखलीच्या आमदार रेखाताई राहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी रेखाताईंचे पती पुरुषोत्तम खेडेकर यांनी संभाजी ब्रिगेडसमोर सध्या युतीसाठी सध्या भाजपा हाच एकमेव पर्याय असल्याचे म्हटले होते. रेखाताईंनी २०१४ मध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून त्या राष्ट्रवादीत असल्या तरी राजकारणात सक्रिय नाहीत.